मुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी अशा गोरेगांव-मुलूंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्याचा वापर होत असताना देखभाल, दुरुस्ती अर्थात परिरक्षण करावे लागणार आहे. या प्रकल्पात जुळे बोगदे हे अत्याधुनिक यंत्रणेसह बांधण्यात येणार असल्याने या बोगद्यातील प्रकाशयोजना, वायूविजन, अग्निशमन, सीसीटीव्ही, दळणवळण संवाद यंत्रणा आदी सर्वांच्या परिरक्षणासाठी पुढील १० वर्षांसाठी सुमारे ३१५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी देखभालीवर सुमारे ३२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गोरेगांव-मुलुंड जोड रस्ता हा सुमारे १२.२० किलोमीटरचा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्प अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगांव स्थित चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाडापर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्येकी ४.७० किलोमीटरचे असतील. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या डोंगराच्या खाली पूर्णपणे जमिनीखालून जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा बोगदा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे अभयारण्यातील वन्यजीवन, जलाशय, वृक्षसंपदा यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही.
या भूमिगत बोगद्यामध्ये शिरण्यासाठी चित्रनगरी परिसरामध्ये पेटी बोगदा देखील बांधण्यात येणार आहे. हा संपूर्ण बोगदा साकारण्याचा कालावधी एकूण ६० महिन्यांचा म्हणजेच ५ वर्षांचा अपेक्षित आहे. एकूणच, या महत्त्वाच्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन तो पूर्ण करण्यात येईल. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कास्टिंग यार्ड उभारणे आवश्यक आहे. ही जागा उपलब्ध करुन देणे महानगरपालिकेला शक्य झाले नाही तर, कंत्राटदारास प्रकल्पापासून २५ किलोमीटर परिसरात सुमारे १० हेक्टर क्षेत्रात कास्टिंग यार्ड तयार करावे लागेल, अशी अट महानगरपालिकेने निविदा अटी व शर्तींमध्येच समाविष्ट केलेली होती. कास्टिंग यार्ड जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिल्यास ही तरतूद कंत्राटदारास देण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. मात्र, महानगरपालिकेला जर जागा उपलब्ध करुन देता आली नाही तर मात्र त्याचा खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे कास्टिंग यार्डच्या १० हेक्टर जागेसाठी ४ वर्षांकरीता २७५ रुपये प्रति चौरस मीटर या प्रचलित शासकीय दराप्रमाणे एकूण १३२ कोटी रुपयांची तरतूद फक्त केलेली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचा – Hanging Garden : मुंबईकरांनो, हँगिग गार्डनमध्ये जाण्यापूर्वी ‘हे’ वाचा, ब्रिटिशकालिन जलाशयाची पुनर्बांधणी करणार)
दोन्ही जुळ्या बोगद्यांच्या कामातून निर्माण होणारा सुमारे २५ लाख क्युबिक मीटर मलब्याच्या विल्हेवाटीसाठी अंदाजे १६९ कोटी ३१ लाख ४६ हजार रुपये इतका खर्च महानगरपालिकेला करावा लागणार आहे. ही तरतूद देखील मलबा विल्हेवाटीच्या वाहतुकीच्या अंतरावर अवलंबून आहे. जुळा बोगदा प्रकल्प हा भूमिगत स्वरुपाचा आहे. त्यामध्ये अनपेक्षित अडचणी/समस्या येऊ शकतात. त्याचा विचार करुन तात्पुरत्या रकमेची तरतूद म्हणून प्रकल्प खर्चाच्या १० टक्के याप्रमाणे ६३० कोटी रुपयांची तात्पुरती तरतूद केली आहे. अर्थात असे असले तरी, हा खर्च करावा लागेलच असे नाही. समस्या उद्भवल्या नाहीत, तर या रकमेची बचत होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले. जुळा बोगदा प्रकल्पामध्ये ५ वर्षांचे बांधकाम, त्यानंतर १० वर्षांचे परिरक्षण या सर्वांसाठी अंदाजे २ हजार ३३१ कोटी रुपयांची किंमत सादिलवार (Cost Contingency/Price Variation) ची तरतूद केलेली आहे. प्रकल्पामध्ये सुमारे १ हजार ८३२ कोटी ५५ लाख रुपयांचा वस्तू व सेवा कर द्यावा लागेल, असा अंदाज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community