सोन्याच्या तस्करीत मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलेल्या सोने तस्कराने महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) च्या कार्यालयातून कागदपत्रासह पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सोने तस्कराला गुरुवारी ट्रँझिस्ट रिमांडवर अहमदाबाद येथे घेऊन जाण्यात येणार होते तत्पूर्वी त्याने पळ काढल्याने डीआरआय कार्यालयात (DIR office) एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुंबईच्या आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुल अशोक कुमार जैन (२७) असे पळून गेलेल्या सोनं तस्कराचे नाव आहे. जैन हा मूळचा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे राहणारा आहे. मेहुल जैन याच्या विरोधात सोनं तस्करी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात १६ जून २०२३ रोजी ‘लूक आउट नोटीस’ (एलओसी) नोटीस जारी करण्यात आली होती. दरम्यान २७ सप्टेंबर रोजी मेहुल जैन हा दुबई येथे पळून जाण्यासाठी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला असता डीआयआर मुंबईच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चर्चगेट येथील कार्यालयात आणले होते. (Mumbai Crime)
(हेही वाचा – Manipur : मणिपूरमधील विद्यार्थी करत आहेत मूक निदर्शने; काय आहेत मागण्या…)
डीआरआय (DIR) अहमदाबाद विभागाचे अधिकारी मुंबईत आले आणि त्यांनी जैन याला सीमा शुल्क कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत अटक केली. दुसऱ्या दिवशी त्याला ट्रान्झिट रिमांडवर अहमदाबादला नेण्यासाठी न्यायालयात हजर केले जाणार होते.त्यासाठी त्याला मुंबई चर्चगेट येथे असणाऱ्या डीआरआयच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. डीआयआरचे सुरक्षा कर्मचारी पहाटे अडीजच्या सुमारास झोपी गेले असता जैन याने डीआयआरच्या कार्यालयातून गुन्ह्यातील कागदपत्रांसह पळ काढला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जैन डीआरआयच्या कार्यालयातून पळून जाताना दिसत आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तेथून पळून जाताना, जैनने संबंधित गुन्ह्यातील कागदपत्रे घेऊन पळ काढल्याचे असेही अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळी जैन कुठेच दिसत नसताना डीआरआयच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांचा शोध सुरू घेतला मात्र तो कुठेच मिळून न आल्यामुळे या घटनेची माहिती डीआरआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी आझाद मैदान पोलिस ठाण्यात मेहुल जैन याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम २२४ (एखाद्या व्यक्तीने त्याच्या कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अडथळा निर्माण करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community