नाशिकच्या विंचूरमध्ये कांदा लिलाव (Onion Auction) सुरू झालेला आहे. यामुळे अखेर कांद्याची कोंडी फुटून ९ व्या दिवशी कांद्याचा लिलाव सुरू झाला आहे. याशिवाय लासलगाव बाजार समितीच्या विंचूरनंतर उपबाजारात सोमवारी लिलावाला सुरुवात झाली. व्यापारी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात बैठक होणार असून एक ते दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत होईल, अशी शक्यता जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी (Fayyaz Mulani) यांनी व्यक्त केली आहे.
२० सप्टेंबरपासून कांदा लिलाव पूर्णत: बंद होते. या काळात शासन आणि प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका पार पडल्या, मागण्या मान्य होत नव्हत्या म्हणून दररोजचे एक लाख क्विंटलचे लिलाव थांबले होते. त्यामुळे २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली. प्रशासनाने तात्पुरते परवाने देऊन जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बाजार समित्यांमार्फत पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते. त्याअंतर्गत लासलगाव बाजार समितीने आधी विंचूर, त्यानंतर निफाड उपबाजारात लिलाव पूर्ववत केला.
अन्य बाजार समित्यांतही कांदा लिलाव सुरू होण्याची शक्यता
कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी २१०० रुपये इतका भाव मिळाला आहे. निफाड बाजारात १८०० क्विंटलचा लिलाव झाला, अशी माहिती बाजार समितीने दिली आहे. गुरुवारपासून लासलगाव बाजार समितीत लिलाव पूर्ववत होतील, अशी खात्री विश्वास मुलाणी यांनी व्यक्त केली आहे. लिलाव पूर्ववत झाल्यास घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यामुळे अन्य बाजार समित्यांतही कांदा लिलाव सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community