मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पक्ष गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असल्याचे चित्र वरकरणी दाखवले जात असले, तरी अजित पवार गट भाजपा आणि शिवसेनेला डोईजड होत चालला आहे. त्यामुळे महायुतीमधील या पक्षाचे महत्त्व कमी करण्याची धडपड सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला अजित पवार गटाला निमंत्रणच पाठवण्यात आले नाही. (Ajit Pawar)
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेना-भाजपा युतीचे रूपांतर महायुतीमध्ये झाले. भिन्न विचारधारेच्या या तिन्ही पक्षांत समन्वय राखण्यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये नुकतीच समन्वय समितीची बैठक झाली. मात्र, या बैठकीला अजित पवार गटाला न बोलावल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (Ajit Pawar)
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत आले असता, अजित पवार यांनी त्यांच्या स्वागताला येणे टाळले होते. उलटपक्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण दौऱ्यात शहांसोबत होते. यावेळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर तिघांमध्ये गुप्त बैठक झाली, त्यालाही अजित पवारांनी दांडी मारली. शिवाय भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्यावेळीही ते फिरकले नाहीत. त्यामुळे पवारांच्या अनुपस्थितीची केंद्रीय नेतृत्त्वाने गंभीर दखल घेतल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात आहे. त्यामुळेच अजित पवार गटाला समन्वय समितीच्या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले नाही, असे कळते. (Ajit Pawar)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबईसाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट होणार)
कोल्ड वॉर?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सर्वच विभागांमध्ये हस्तक्षेप वाढू लागल्याने शिवसेना आणि भाजपाच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. यासंदर्भात आपल्या वरिष्ठांकडे अनेकांनी तक्रारीही केल्या. मात्र, पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी सुरू केल्याने अस्वस्थतेचे रुपांतर ‘कोल्ड वॉर’मध्ये होऊ लागले आहे. समन्वय समितीच्या बैठकीला न बोलावणे, हाही या शीतयुद्धाचा भाग आहे. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community