ब्रेक दि चेन मोहिमेअंतर्गत राज्यात मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. याची काटेकोर अंमलबजावणी सोमवार पासून करण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिका-यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ब्रेक दि चेन मोहिमेसंदर्भात स्पष्टता केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी एक परिपत्रक जाहीर करत या सूचना दिल्या आहेत.
अशा आहेत सूचना
- स्पर्धा-परीक्षांसह इतर महत्त्वाच्या परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना या मिनी लॉकडाऊन तसेच विकेंड लॉकडाऊनच्या काळात परीक्षा गृहांवर जाण्यास परवानगी असेल. परीक्षा केंद्राचे हॉल तिकीटवर त्यांना प्रवासासाठी परवानगी देण्यात येईल. तसेच त्यांना त्यांच्यासोबत एका व्यक्तीला घेऊन जाण्याची परवानगी असेल.
- अत्यावश्यक वस्तू आणि ऑनलाईन पार्सल सेवा सर्व दिवशी २४ तास चालू असेल. विकेंड लॉकडाऊनला कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष हॉटेलमध्ये जाऊन पार्सल घेण्यावर बंदी असणार आहे.
- विकेंड लॉकडाऊनच्या वेळी स्ट्रीट फूड सेवा ही फक्त पार्सल स्वरुपात चालू राहील. या काळात कोणालाही रस्त्यावर उभे राहून खाता येणार नाही.
- मोलकरणी, स्वयंपाकी, ड्रायव्हर्स, घरगडी, गरजूंना सेवा देणारे आरोग्य कर्मचारी यांना दररोज सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ये-जा करण्यास परवानगी असेल.
- डोळ्ंयाचे दवाखाने तसेच चष्म्याची दुकाने या काळात पूर्णपणे चालू असतील.