मंगळवारी दुपारी मंत्रिमंडळ बैठक आटोपल्यानंतर नियोजित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Shinde-Fadnavis) एकाएकी दिल्लीला रवाना झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून तातडीचा निरोप आल्याने दोघांनीही राजधानी गाठल्याचे कळते.
रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लावण्यासाठी शिंदे-फडणवीस दिल्लीला गेल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले. मात्र, अजित पवार त्यांच्या सोबत नसल्यामुळे या दिल्लीवारीला अंतर्गत राजकारणाची किनार दिसून येत आहे. विशेष म्हणजे दुपारच्या कॅबिनेट बैठकीलाही पवार नव्हते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत आले असता, अजित पवार यांनी त्यांच्या स्वागताला येणे टाळले होते. उलटपक्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण दौऱ्यात शहांसोबत होते. यावेळी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर तिघांमध्ये गुप्त बैठक झाली, त्यालाही अजित पवारांनी दांडी मारली.
शिवाय भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J.P. Nadda) यांच्या दौऱ्यावेळीही ते फिरकले नाहीत. त्यामुळे पवारांच्या अनुपस्थितीची केंद्रीय नेतृत्त्वाने गंभीर दखल घेतल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात आहे. त्यामुळेच अजित पवार गटाला समन्वय समितीच्या बैठकीचे निमंत्रण पाठविण्यात आले नव्हते. त्या पाठोपाठ आता दिल्ली भेटीचाही निरोप न मिळाल्यामुळे महायुतीमधील घटकपक्षांत सारे काही आलबेल नाही का, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचा – Mangalyaan-2 Mission : इस्त्रोने केली नवीन घोषणा, मंगळावर जाण्याची तयारी सुरू)
मंत्र्यांकडून तक्रारी
उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा सर्वच विभागांमध्ये हस्तक्षेप वाढू लागल्याने शिवसेना आणि भाजपाच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. यासंदर्भात अनेकांनी वरिष्ठांकडे तक्रारीही केल्या. मात्र, शिर्ष नेतृत्त्वाने सबुरीचा सल्ला दिली. परंतु, पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी सुरू केल्याने अस्वस्थेने नाराजीचे रुप धारण केले आहे. शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली भेटीत याबाबतही चर्चा होईल, असे समजते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community