राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागला असून, आता यावरून राजकारणदेखील तापले आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी अधिक डोस दिले जातात, तर महाराष्ट्राला कमी डोस दिले जातात, असा गंभीर आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर केला.
शरद पवारांनीही लसीची केली मागणी!
केंद्राकडे आम्ही आठवड्याला 40 लाख लसी द्याव्यात, अशी मागणी केली आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोलले आहेत. आजपासून सातारा, सांगली, पनवेल येथील लसीकरण बंद पडले आहे. राज्यात लसीकरणाची केंद्रे वाढवली आहेत, पण लसी उपलब्ध नाहीत. महाराष्ट्राला साडे सात लाख आणि इतर राज्यांना जास्त लसी का पाठवल्या गेल्या? आम्हाला कुणाशी वाद घालायचा नाही आणि कुणाला दोषही द्यायचा नाही, असेही मंत्री टोपे म्हणाले.
गुजरातला झुकते माप!
18 ते 45 हा वयोगट जास्त बाहेर वावरत असतो आणि तोच जास्त संसर्गित होत आहे. परिणामी संसर्ग फोफावत आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात यावी. हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती, मात्र केंद्राकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र सरकार मदत करत आहे. पण जशी मदत करायला हवी तशी मदत होत नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता गुजरातपेक्षा महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त आहे, तरीही गुजरातला 1 कोटी लसी दिल्या आणि महाराष्ट्राला 1 कोटी 4 लाख लसी दिल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
(हेही वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध… काय म्हणाले मुख्यमंत्री?)
दहा लाखांमागे तीन ते चार लाख लोकांचे टेस्टिंग
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लसीकरण करण्यास सांगितले आहे. मात्र, आम्हाला एका आठवड्याचा साठा होईल इतक्या अतिरिक्त लसी द्या, अशी मागणी आम्ही केली. त्याची केंद्रीय आरोग्यमंत्री दखल घेतील, असे राजेश टोपे म्हणाले. आम्ही पारदर्शक पद्धतीने कारभार करत आहोत. चाचणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार चालवतोय. राज्यात 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के अँटिजेन टेस्ट करतो. उत्तर प्रदेशात 90 टक्के अँटिजेन टेस्ट होतात. अँटिजेन टेस्ट करु नये, असा नियम आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये टेस्टिंग वाढवले आहे. दहा लाखांमागे तीन ते चार लाख लोकांचे टेस्टिंग करत आहे, असेही टोपे म्हणाले.
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांवर टीका
महाराष्ट्राची कामगिरी चांगली नाही म्हणून कोरोना वाढतोय हे सांगितले जात आहे, जे चुकीचे आहे. महाराष्ट्राकडे केवळ दीड दिवसाचा लसीचा साठा आहे. अनेक जिल्ह्यात लसीकरण ठप्प होते. केंद्राने 17 लाख लसी दिल्या, आमची मागणी 40 लाख लसी इतकी असल्याचे टोपे म्हणाले.
रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत बैठक घेणार!
रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत बैठक घेणार आहे. आमच्या गरजेप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन दिले पाहिजे आणि त्याची किंमत 1200 रुपये झाली पाहिजे. काही खासगी दवाखाने रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज नसताना वापरतात. त्यांना सांगायचे आहे सध्या महामारीचे दिवस आहेत नफेखोरीचे नाहीत, असेही आवाहन राजेश टोपे यांनी केले. महाराष्ट्रासाठी 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या टीम आलेल्या आहेत. त्या लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन याची माहिती घेणार आहेत. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. इथे विमानतळे आहेत. 50 टक्के शहरीकरण झालेले राज्य आहे. त्यामुळे इतर राज्यांशी तुलना करता येणार नाही. आम्हाला जनतेची काळजी आहे त्यामुळे वाद न घालता हातात हात घालून केंद्र आणि राज्याने काम केले पाहिजे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री आणि शरद पवार रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कंपन्यांशी बोलत आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. आरोग्य हा राज्याचा विषय असला तरी लसीकरण हा केंद्राचा कार्यक्रम आहे. त्यामुळे केंद्राने आम्हाला आमच्या गतीप्रमाणे लस उपलब्ध करुन द्यावी, तसेच बाहेरच्या राज्यातूनही लस द्यावी, अशी मागणी टोपे यांनी केली.
Join Our WhatsApp Community