सांगली जिल्ह्यातील कडेगाव (Sangli Kadegaon) तालुक्यातील वांगी गावात पूर्व वैमनस्यातून मानवजातीला काळीमा देणारी घटना घडली आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दिवंगत शंकरराव निकम यांच्या संपूर्ण कुटुंबियांनाच मारण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सूरज निकम यांनी चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात (Chinchani Vangi Police Station) तक्रार दाखल केली आहे.
स्वातंत्र्यसेनानी कै. शंकरराव निकम यांचे मोठे सुपुत्र अशोकराव निकम वांगीच्या उत्तरेस शिवणी रोडलगत वास्तव्यास आहेत. काल रात्री (मंगळवारी) बारा ते दीडच्या सुमारास निकम कुटुंबीय झोपलेले असताना अज्ञातांनी जवळच असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफॉर्मरमधून केबल जोडून घराच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला. निकम यांच्या घराजवळ असणाऱ्या हेवी ट्रान्सफॉर्मरमधून तारा जोडून त्या शेतातील घराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाराच्या कोयंड्यांना जोडण्यात आल्या. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने सुमारे एक हजार फूट अंतरावरून या जोडलेल्या तारांचे नियंत्रण करायचे आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची तार खेचायची, अशा हेतूने हल्लेखोरांनी त्याची जोडणी केली होती. रात्री दीडच्या सुमारास त्याचा चाप खेचला असावा. त्यामुळे तारांवर अचानक लोड येऊन ट्रान्सफॉर्मर जवळ स्फोट होऊन जाळ लागला. त्यानंतर झालेल्या मोठ्या आवाजाने आणि आगीमुळे जागे झालेल्या निकम कुटुंबियांनी दरवाजा उघडला, मात्र यामुळे झालेल्या स्फोटामुळे सुदैवाने घराबाहेर पडताना कडी-कोयंड्यांना हात लागूनही त्यांना विजेचा धक्का बसला नाही. काही वेळाने वीज पूर्ववत आल्यानंतर सूरज निकम यांच्या मातोश्रींना हलकासा विजेचा धक्का बसला. त्यामुळे सावध झालेल्या निकम कुटुंबियांनी हा आपल्याला सहकुटुंब मारून टाकण्याचा डाव आहे, हे जाणून घेण्यासाठी तातडीने बचावाच्या हालचाली केल्या आहेत.
(हेही वाचा – Mangal prabhat Lodha : मुंबई उपनगरात झोपडपट्टीवासियांसाठी सरकार बांधणार ४० हजार शौचालये)
हे हल्लेखोर कोण होते, याचा अद्याप सुगावा लागलेला नाही. मध्यरात्रीनंतर अशोकराव यांचे पुत्र सूरज निकम यांनी पोलिसांना कळवले. याप्रकरणी सूरज निकम यांनी काही व्यक्तिंच्या बाबतीत संशय व्यक्त केला असून त्यांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community