मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभागातून विभाजन करुन नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पी-पूर्व विभाग कार्यालयाच्या प्रारंभिक सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सेवांसह या कार्यालय लोकार्पण करण्याचा समारंभ राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते बुधवार, ४ ऑक्टोबर २०२३ पार पडला. पी पूर्व विभाग कार्यालय अंशतः सेवांसह बुधवारपासून कुंदनलाल सैगल नाट्यगृहात सुरु करण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने आणि स्वतंत्र इमारतीत हे कार्यालय लवकरात लवकर सुरु करण्यात येणार आहे. मात्र, हे स्वतंत्र विभाग कार्यालय सुरु झाले असले तरी या विभागाचा प्रभारी कार्यभार हा पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त दिघावकर यांच्याकडेच राहणार असून भविष्यात या पी पूर्व विभागासाठी स्वतंत्र सहायक आयुक्तांची नियुक्ती केली जाणार आहे. (Malad BMC Office)
महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाचे विभाजन करुन पी पूर्व आणि पी पश्चिम असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. या पुनर्रचनेनंतर नवनिर्मित पी पूर्व विभागाचे स्वतंत्र कार्यालय लवकरात लवकर सुरु करण्यात येईल, तसेच त्यामध्ये नागरी सुविधा केंद्र, आवक-जावक विभाग यासह आपत्कालीन नियंत्रण कक्ष, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा, परिरक्षण या प्रारंभिक सेवांचा समावेश करुन पी पूर्व विभागाचे प्रारंभिक कामकाज सुरु करण्यात येईल, अशी हमी महानगरपालिका प्रशासनाने दिली होती. त्यानुसार, नागरिकांची सोय व्हावी, यादृष्टिने मालाड (पूर्व) मधील रामलीला मैदान परिसरात कुंदनलाल सैगल नाट्यगृहात सध्या सुमारे ९ हजार ६०० चौरस फूट क्षेत्रफळाची तात्पुरती जागा शोधून तेथे पी पूर्व विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. पी पूर्व विभाग कार्यालयाच्या या सेवांचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी खासदार गजानन कीर्तिकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील प्रभू, आमदार अतुल भातखळकर, आमदार अस्लम शेख, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते. (Malad BMC Office)
(हेही वाचा – Financial Fraud : फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचे मिटिंग पॉईंट ठरत आहे मंत्रालय, विधानभवन परिसर)
आता या स्वतंत्र विभागाच्या निर्मितीनंतर ज्या काही गरजा आहेत, त्यांची पूर्तता करावी लागेल. विभागाच्या तात्पुरत्या कार्यालयापासून ते कायमस्वरूपी स्वतंत्र कार्यालयामध्ये स्थलांतरित होईपर्यंत नागरी सेवा-सुविधांना प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत खासदार गोपाळ शेट्टी यांनी मांडले. खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, पूर्ण क्षमतेने पी पूर्व कार्यालय सुरु झाल्यानंतर नागरिकांना अधिकाधिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. आमदार तथा माजी महापौर सुनील प्रभू म्हणाले की, महानगरपालिकेकडून विभाग कार्यालयामध्ये देण्यात येणाऱ्या सर्व सेवांचा समावेश असलेले संपूर्ण क्षमतेचे स्वतंत्र असे कार्यालय उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जोमाने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही केली. (Malad BMC Office)
आमदार अतुल भातखळकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पी पूर्व विभाग तात्पुरत्या जागेत सुरु केले असले तरी त्यावर न थांबता स्वतंत्र इमारतीमध्ये सगळ्या सेवांसह हे कार्यालय सुरु करावे. त्याचप्रमाणे, कुंदनलाल सैगल नाट्यगृह मनोरंजनासाठी पुन्हा व लवकरात लवकर महानगरपालिकेच्या वतीने खुले करून द्यावे, अशी मागणीही. भातखळकर यांनी केली. प्रशासनाच्या वतीने माहिती देताना पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, संपूर्ण क्षमतेच्या विभाग कार्यालयात एकूण १७ विविध खात्यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे दिंडोशी कुरार भागातील नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी, घनकचरा, आरोग्य, पाणी यासारख्या महत्त्वाच्या विभागांच्या सेवा लगेचच मिळू शकतील. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीतून खर्चिक प्रवास करून पी उत्तर कार्यालयापर्यंत येण्याची गरज राहणार नाही. कुरार आणि मालाड भागातील नागरिकांची यातून सुविधा होणार आहे. (Malad BMC Office)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community