दादर येथील महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात ३ ऑक्टोबर रोजी मगरीचे पिल्लू आढळून आल्यामुळे खळबळ माजली होती. (Baby Crocodile In Swimming Pool) त्या वेळी मगरीचे पिल्लू वन विभागाने ताब्यात घेतले होते; मात्र ते जलतरण तलावात कुठून याविषयी तर्क-वितर्क लावले जात होते. याच वेळी जवळच असलेल्या बेकायदा प्राणिसंग्रहालयातून ते आले असावे, असा अंदाज पालिकेने व्यक्त केला होता, तसेच त्यावर कारवाई करण्याची मागणीदेखील करण्यात आली होती. याविषयी मनसेचे संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये ते मगरीचे पिल्लू शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून आल्याचे दिसून येत आहे. (Baby Crocodile In Swimming Pool)
संदीप देशपांडे यांनी या व्हिडिओ ट्विट करण्यासह ‘हे प्राणी संग्रालय नसून हा आहे प्राणी तस्करी चा अड्डा’, आहे असे आरोप केले आहेत. मगर सापडल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. आता सीसीटीव्हीमध्ये ही मगर शेजारील प्राणीसंग्रहालयातून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मात्र मनसेने हा गुन्हा शेजारी असलेल्या प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर करावा, अशी मागणी मनसेकडून केली जात आहे. (Baby Crocodile In Swimming Pool)
दादरमधील महात्मा गांधी स्मारक आंतरराष्ट्रीय जलतरण तलावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सापाचा वावर वाढला आहे. मध्यंतरी जलतरण तलावामधील पंप हाऊसच्या परिसरात धामण जातीचा साप आढळून आला होता. त्यापूर्वी जून महिन्यात अजगरही दिसून आले होते. तेव्हा मनसेचे विभागप्रमुख आणि या तरण तलावाचे सदस्य असलेल्या संतोष धुरी यांनी बाजूच्या छोट्या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन तेथील सापांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तसेच जर हे प्राणिसंग्रहालय अनधिकृत असेल, तर त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. आता त्याच्या पुढे जाऊन मगरीचे पिल्लू सापडण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेजारील प्राणिसंग्रहालयाच्या विरोधात गुन्हा नोंद कारण्याची मागणी जोर धरत आहे. (Baby Crocodile In Swimming Pool)