सिक्कीममध्ये बुधवारी ढगफुटीनंतर तीस्ता नदीला आलेल्या भीषण पुरात आत्तापर्यंत २२ जण ठार झाले असून यात ८ जवानांचाही समावेश आहे, तर १०२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. (Sikkim Flood) त्याचबरोबर तब्बल ३,००० पर्यटक अनेक मार्ग बंद झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये अडकून पडले आहेत. सिक्कीमसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. हवामान खात्याने (IMD) सिक्कीममध्ये २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एवढेच नाही, तर बिहार, बंगाल, मेघालय, आसाम आणि झारखंडमध्येही मुसळधार पाऊस पडू शकतो. ढगफुटीनंतर आलेल्या पुराच्या जखमा सर्वत्र दिसत आहेत. तीस्ता नदीचा प्रलयकारी प्रवाह सर्व सोबत घेऊन गेला आहे. पण हे केवळ आपत्तीचे लक्षण होते. येत्या काही तासांत पुन्हा तीच पूरस्थिती दिसू शकते. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी अलर्ट जारी केला आहे. (Sikkim Flood)
(हेही वाचा – Samruddhi Highway : समृद्धी महामार्ग पाच दिवसांसाठी बंद; नेमकं कारण काय?)
सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुराने लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री दीडच्या सुमारास ल्होनाक तलावावर ढग फुटले, त्यानंतर लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी अचानक १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा परिसर जलमय झाला. नदीचे पाणीही अनेक घरात शिरले. (Sikkim Flood)
नदीला लागून असलेल्या परिसरात लष्कराची छावणी होती, ती पुराच्या तडाख्यात वाहून गेली आणि तेथे उभी असलेली अनेक वाहने बुडाली. यामध्ये अनेक सैनिक बेपत्ता असून सैन्याची ४१ वाहनेही वाहून गेली आहेत. १७ सप्टेंबर आणि २८ सप्टेंबर रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये ल्होणक तलावाचे क्षेत्रफळ १६२.७ आणि १६७.४ हेक्टर असल्याचे दिसून येते. या दुर्घटनेनंतरचे चित्र असे की, तलावाचे अर्ध्याहून कमी क्षेत्र शिल्लक राहिले असून आता सुमारे ६०.३ हेक्टर क्षेत्रात पाणी दिसत आहे. ल्होनाक तलावातील १०५ हेक्टरमध्ये भरलेले पाणी वाहून गेले आणि वेगाने हे पाणी सिक्कीमच्या सखल भागात गेले आणि त्यामुळे प्रचंड विध्वंस झाला. त्याचबरोबर पुरात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून बचाव मोहीम राबविण्यात येत असून, ४ हजारांहून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. (Sikkim Flood)
राष्ट्रीय महामार्ग-10 देखील अनेक ठिकाणी वाहून गेला
तिस्ता नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे कलिमपोंग, दार्जिलिंग, अलीपुरद्वार आणि जलपाईगुडीला सर्वाधिक फटका बसला आहे. सिक्कीम आणि देशाच्या इतर भागांमधला मुख्य दुवा असलेला राष्ट्रीय महामार्ग-१० देखील अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत असून भविष्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीममधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग देखील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. बचावकार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्याशी बोलून मदतीचे आश्वासन दिले.
दरम्यान, मंगन, गंगटोक, पाक्योंग आणि नामची जिल्ह्यातील सर्व शाळा शिक्षण विभागाने ८ ऑक्टोबरपर्यंत बंद केल्या आहेत. सिक्कीममध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक पूल कोसळले. काल जिथे रस्ते होते, ते आज नद्या बनले आहेत आणि ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसाने सिक्कीमच्या लोकांना अविस्मरणीय वेदना दिल्या आहेत, अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (Sikkim Flood)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community