Marathi : मराठी माणसाने धंदा करावा; नको ते धंदे करु नये

216

– जयेश शत्रुघ्न मेस्त्री

ब्रिटिशांच्या काळात ’इंडियन्स ऍंड डॉग्स आर नॉट अलाऊड’ अशी पाटी लागलेली असायची असं ऐकलं होतं. भारतीयांना कुत्र्यापेक्षाही तुच्छ लेखण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता. कारण ते आपल्यावर राज्य करत होते, आपण त्यांचे गुलाम होतो. म्हणून त्यांनी हा माज दाखवणे स्वाभाविक होते. आता सोशल मीडियावर एक फोटो फिरतोय. रिक्षाचा एक फोटो आहे आणि मागच्या बाजूला लिहिलंय, “जय महाराष्ट्र मुंबईचा रिक्षावाला. गुजराती आणि कुत्र्यांना परवानगी नाही.”

एकीकडे मुंबईतल्या मराठी माणसावर अन्याय होतोय असं म्हणायचं आणि दुसरीकडे स्वतःच्याच पोटावर पाय मारायचा, ही कोणती अनोखी पद्धत आहे?  मराठी माणसाच्या मनात हा द्वेष दोन पिढ्यांआधी पेरण्यात आला. परप्रांतीयांकडून मुंबईतल्या मराठी माणसावर अन्याय होतोय अशी बोंब मारण्यात आली. मराठी माणसाच्या हातात स्वतःची उन्नती करणारी उपकरणे देण्याऐवजी दगड देण्यात आला. त्याने परप्रातीयांच्या दुकानांवर दगडफेक केली आणि त्याचबरोबर त्याने स्वतःच्या नशीबावर देखील दगडफेक केली.

मुंबईत मराठी माणसाचा टक्का घटत चालला आहे, याचं कारण परप्रांतीय आहेत असं वरवर वाटत असलं तरी मराठी माणसांना ’कोणता व्यवसाय घेऊ हाती’ हा प्रश्न पडण्याऐवजी ’कोणता झेंडा घेऊ हाती’ हा प्रश्न पडू लागला. यामुळे मराठी माणसाचे व्हायचे तितके नुकसान झालेले आहे. आता काळ बदलतो आहे. आपण प्रचंड आधुनिक युगात पाऊल ठेवले आहे. इथे आपल्याला संधी साधून स्वतःची प्रगती करुन घेणे क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीत जर मराठी माणूस व्यवसायाकडे लक्ष न देता, द्वेषापोटी आपले गुजराती ग्राहक गमावत असेल तर मात्र मराठी माणसाला भविष्यात कोणीच वाली राहणार नाही.

गुजराती माणसाचा द्वेष केल्याने गुजरात्यांचे काही जाणार आहे का? मुंबईतील गुजराती लोक व्यवसाय आणि चांगल्या दर्जाच्या नोकर्‍या करुन सुखावह आयुष्य जगत आहेत. कष्टाच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर आपले कर्तृत्व दाखवत आहेत. त्यांना तुम्ही कितीही हिणवलं तरी त्यांची प्रगतीच होणारच आहे. त्यामुळे त्यांचा द्वेष करण्याऐवजी आपल्या कामावर लक्ष देऊन, ग्राहक देव असतो असे मानून व्यवसाय केला तर पुढे जाऊन एका रिक्षापासून ५ – ६ रिक्षा अशी प्रगती होऊ शकते. मराठी माणसाने राजकीय अविचारांच्या नादी लागून स्वतःचे नुकसान करुन घेऊ नये.  मराठी माणसाने धंदा करावा, नको ते धंदे करु नये…

(हेही वाचाCyber Crime : कंत्राटदाराकडून सरकारी कार्यालयांना अधिकाऱ्याच्या बदल्यांचे मेल, उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटरहेड आणि स्वाक्षरीने केला मेल एकाला अटक )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.