सचिन वाझेवर कारवाई केली तर तो सरकारला अडचणीत आणील अशी माहिती उघड करील, म्हणून महाविकास आघाडी सरकार त्याची पाठराखण करत होते. मात्र आता सर्व बाहेर आले आहे, त्यामुळे हे सरकार वसुली सरकार आहे. यांचा पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटा हाच एकमेव कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे निघाली आहेत, म्हणून नैतिकदृष्ट्या हे सरकार सत्तेत राहण्यास लायक नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
जनतेने निवडून दिलेले हे सरकार नाही!
दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतले. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतले. जगात सगळे पाहिले असेल, पण पोलीसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिले नसेल. हेही मुंबईने पाहिले. पोलीसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते, असेही केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले. मुळात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. कारण महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेनेला मते दिली होती. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून मते मागितली होती. त्यानंतर शिवसेनेने भाजपाला बाजूला करून दोन्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली, कारण त्यांना वसुली सरकार स्थापन करायचे होते, असाही आरोप केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी केला.
(हेही वाचा : जिथे भाजपची सत्ता तिथे लसी जास्त ! राजेश टोपेंचा केंद्रावर गंभीर आरोप)
५ लाख लसींचे डोस वाया गेले!
महाराष्ट्र सरकार केंद्र शासनावर आरोप करत आहे. केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधात्मक लसी पुरवत नाही, अशी ओरड करत आहे. वस्तुतः राज्यात ५ लाख लसी वाया गेल्या आहेत. कारण राज्यात लसीकरणासाठीचे योग्य नियोजन नाही, त्यामुळे राज्याने आधी नियोजन योग्य प्रक्रारे करावे ते न करता चोर तो चोर वर शिरजोर, असे महाराष्ट्र सरकार वागत आहे, असेही केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community