-
ईश्वरी मुरुडकर
मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरवस्थेवरून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यम समन्वयकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे मुंबई अध्यक्षांच्या माध्यम समन्वयकाने मंत्री रवींद्र चव्हाण यांना इतरांची (विनोद तावडे यांची) कॉपी न करण्याचा सल्ला दिल्यामुळे भाजपात सरळसरळ दोन गट पडलेत की काय, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. (BJP)
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे माध्यम समन्वयक प्रशांत डिंगणकर यांनी गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर त्यांना आलेल्या वाईट अनुभवाचे कथन सोशल मीडियावर केले. डिंगणकर लिहितात, गणेशोत्सवाला कोकणात जाताना मुंबई ते गुहागर या ३०० किलोमीटरच्या अंतरसाठी ७ तासांऐवजी लागलेले १५ तास, त्यामुळे झालेले हाल, त्यात बदलत्या वातावरणामुळे आलेला ताप, या सगळ्यांतून बरा झाल्यानंतर आज मी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रसिद्धी प्रमुख गोविंद येतेकर यांना फोन करून विचारले की, काय गोविंदराव मंत्री महोदयांची तब्बेत वगैरे बरी आहे ना… माझ्या अचानक आलेल्या प्रश्नाने गोंधळून गेलेले गोविंदराव म्हणाले की, मंत्री महोदय बरे आहेत, तू का असे विचारतोय? मी म्हटले की, त्यांच्यामुळे यावेळी कोकणी माणसाला अभूतपूर्व त्रास सहन करावा लागला. गणेशोत्सवाला जाता-येताना प्रचंड हाल झाले. अशावेळी मंत्री महोदयांची मोठमोठी होर्डिंग्ज, त्यामधला त्यांचा हसरा चेहरा… त्या त्यांच्या हास्याला कोकणी माणसाची नजर वगैरे लागली नाही ना, म्हणून चौकशी केली वगैरे वगैरे… (BJP)
विषय असा आहे की, मी गेली वीस ते पंचवीस वर्षे मुंबई-गोवा हायवेवरून गणेशोत्सव आणि होळीच्या वेळी प्रवास करतो. ज्यावेळी जुना रस्ता होता त्यावेळी आणि काँग्रेसच्या राजवटीत रस्त्याच्या कामाचा खेळखंडोबा मांडला गेला, त्या प्रत्येक वर्षी मी या रस्त्यावर प्रवास केला आहे. पण यावर्षी इतका अभूतपूर्व त्रास कधीच सहन करावा लागला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेशोत्सवाच्या आधी महिनाभर या रस्त्याचे दौरे करायला सुरुवात केली. त्याच्या मोठमोठ्या बातम्या आणि प्रसिद्धीही जोरदार केली. काहीही झाले तरी एक लेन काँक्रिटची करणार, अशी घोषणा केली. त्यानुसार काही ठिकाणच्या कामाचे फोटोही आले, तसेच कशेडी बोगद्याची एक लेन खुली करणार असेही जाहीर करण्यात आले. त्यामुळे कोकणी माणसाला वाटले, यावेळी रस्ता फारच सुसाट झाला आहे. परिणामी, दरवेळी पुणे मार्गाने जाणाऱ्या गाड्याही यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरून गेल्या आणि अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. (BJP)
कशेडी घाटातील एक लेन खुली झाली खरी; पण पळस्पे ते इंदापूर येथे एक लेन ज्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले, तिथे सिमेंट सुकले नाही. त्यामुळे कंत्राटदाराने ती लेन झाकून ठेवली. अनेक ठिकाणी रस्ता एकच गाडी जाईल एवढा शिल्लक आहे, त्याचा विचारच करण्यात आला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि एका एका जागी तासतासभर खोळंबून रहावे लागले. प्रचंड उकाडा, त्यात लहान मुले, कुणाची गाडी गरम झाली म्हणून रस्त्यात बंद पडली, एसटीमध्ये खाण्यापीण्याचे हाल, अशा मरण यातना प्रवाशांना सहन कराव्या लागल्या. बरे हे सगळे सुरू असताना मंत्री महोदयांची मोठमोठी लावण्यात आलेली होर्डिंग्ज आणि त्यावर त्यांचा हसरा चेहरा. वाटत होते की आमचे हाल बघून तर ते हसत नाहीत ना…? विशेष म्हणजे जिथे जिथे वाहतूक कोंडी होत होती तिथेच ही होर्डिंग्ज लावण्यात आली होती. (BJP)
खरे तर विनोद तावडे जे करायचे, जे कोकणी माणसाला बरे वाटायचे, तेच रवींद्र चव्हाण करायला गेले आणि कोकणी माणसाच्या रोषाचे धनी झाले. तावडे हे कोकणचे नेते आहेत. त्यांना कोकणच्या प्रश्नाचे भान आहे. त्यामुळे त्यांना हे सगळे जमून गेले होते. म्हणून त्यांची कॉपी करायला कुणी जाऊ नये. विशेष म्हणजे तावडे साहेबांचा माध्यम समन्वय म्हणून काम पाहणारा आमचा मित्र गोविंद येतयेकर हाच सध्या मंत्री महोदयांचा माध्यम समन्वयक आहे. बातमी लिहिणारा तोच आहे, बातमी पाठवणाराही तोच. असो. प्रश्न तो नाही, प्रश्न आमचे कधी सुटणार हा आहे. त्यामुळे अगतिक, हतबल, हताश झालेल्या कोकणी माणसांच्यावतीने यावेळी गणती बाप्पाला आम्ही नवस केलाय… हा प्रश्न सुटू दे रे बाप्पा…! (BJP)
(हेही वाचा – I.N.D.I.A Allince : लोकसभेच्या जागावाटपासाठी आघाडीची समिती)
मंत्र्यांच्या ‘पीआरओ’ने काय उत्तर दिले?
- रवींद्र चव्हाण साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर तब्बल १५ ते १६ वेळा या महामार्गाची रस्त्यावर उतरून पाहणी केली. एकीकडे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी केली, तर दुसऱ्या बाजूला या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात आठवडा-दर आठवडाला मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू असायचा. दर दिवशीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ड्रोन चित्रणाचीही व्यवस्थाही करण्यात आली होती. (BJP)
- मंत्री महोदयांची यंत्रणाही या महामार्गाच्या कामात स्वतंत्र्यपणे गेल्या वर्षभरात विविध पद्धतीने काम करीत होते. त्यामुळे गणपतीपूर्वीच मंत्र्यांनी फक्त महिनाभर आधी दौरे केले नाहीत, तर गेल्या वर्षभरापासून दौरे, बैठका सुरू आहेत. कदाचित आधीच्या बातम्या नजरेतून सुटल्या असतील. (BJP)
- गेल्या-१३-१४ वर्षांत झाली नाही इतकी प्रगती किमान या वर्षभरात मुंबई-गोवा महामार्गाची झाली हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. अन्यथा यंदाच्या गणपतीमध्ये कशेडी बोगद्याच्या सिंगल लेनवरून चाकरमान्यांना प्रवासच करता आला नसता. मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणपतीपूर्वी पूर्ण करणार, असे वचन मंत्री चव्हाण साहेब यांनी विधिमंडळात दिले होते. त्या वचनाची त्यांनी पूर्तता केली. (BJP)
- त्यामुळेच कधी नव्हे ते इतक्या वर्षात कोकणात जाणारे गणेशभक्त यंदा प्रथमच मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करीत गणपतीसाठी सुखरुप पोहोचले. (मुंबई-पुणे एक्सप्रेस वे व्हाया बंगलोर हायवेचा मार्ग अनेकांनी गणपतीच्या काळात स्कीप केला) एकाच वेळी हजारो खासगी गाड्या या महामार्गावरुन कोकणाकडे निघाल्या. एसटीनेही यंदा ३५०० विशेष गणपती स्पेशल एसटी गाड्या सोडल्या होत्या, त्याही याच महामार्गावरुन धावत होत्या. (BJP)
- विविध राजकीय पक्षांनी गणेश भक्तांसाठी मोफत एसटी गाड्या सोडल्या होत्या. यामध्ये खासगी बसेस ट्रॅव्हल्सह मोठ्या गाड्यांचीही भर होती. त्यामुळेच कधी नव्हे ते हा मार्ग जाम झाला व या महामार्गावर अभूतपुर्व वाहतूक कोंडी झाली. ही वाहतूक कोंडी रस्ता खराब असल्यामुळे नाही, तर हजारो वाहने एकाच वेळेला रस्त्यावर आल्यामुळे झाली. माणगावपर्यंत बहुतेक सर्वच गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागला. त्या सर्वच गणेश भक्तांमध्ये मी व प्रशांतसुद्धा होतो. (BJP)
- मुख्य समस्या होती ती पनवेल ते इंदापूर या दरम्यानच्या ८४ किमीच्या रस्त्याची. परंतु आता या ८४ किमी अंतरामधील सिंगल लेनचे काम बहुतांश पूर्ण क्रॉक्रिटीकरण झाले आहे. मंत्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंगल लेनचे काम मिशन मोडवर पूर्ण करण्यात आले. या महामार्गाच्या कामासाठी मंत्री महोदयांनी सर्व शासकीय यंत्रणा खऱ्या अर्थाने युद्धपातळीवर कामाला लावली. पावसाचे महिने असतानाही त्यांच्या सूचनेनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरून भर पावसातही या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. (BJP)
- या महामार्गावर हसऱ्या फोटोचे होर्डिंग नक्की काही जणांनी आवर्जून पाहिले. पण त्याच होर्डींगच्या बाजूला सिंगल लेन पूर्ण झाल्याबद्दल मंत्री महोदय व सरकारचे अभिनंदन करणारे अराजकीय संघटनांचे होर्डिंग काही जण गाडीत डुलकी लागल्यामुळे पाहू शकले नाहीत, असा टोला मंत्री चव्हाण यांचे माध्यम समन्वयक गोविंद येतेकर यांनी आशिष शेलार यांचे माध्यम समन्वयक प्रशांत डिंगणकर यांना लगावला आहे. (BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community