-
ऋजुता लुकतुके
आशियाई क्रीडास्पर्धेत क्रिकेटमध्ये भारताने आणखी एक पदक निश्चित केलं आहे. पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव केला. भारताची अंतिम फेरीत गाठ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील विजेत्या संघाशी पडेल. आशियाई क्रीडास्पर्धेत मागचे काही दिवस भारताची सुवर्ण धाव गतीमान झाली आहे आणि त्यातच आता पुरुषांच्या क्रिकेट संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. (Asian Games 2023)
म्हणजेच महिलांप्रमाणेच पुरुषांचं पदकही निश्चित झालं आहे. उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. विशेष म्हणजे बांगलादेश संघाने २० षटकांत ९६ धावा केल्या आणि हे लक्ष्य भारतीय संघाने दहाव्या षटकांतच पार केलं. भारत काय किंवा बांगलादेश काय, ज्येष्ठ खेळाडू एकदिवसीय विश्वचषकात खेळत असल्यामुळे आशियाई खेळांमधील संघ हे दुय्यम आहेत. पण, सध्या भारतीय दुसरी फळी किती मजबूत आहे याचं प्रत्यंतर वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि पाठोपाठ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दिसून आलंच आहे. तेच चित्र होआंगझाओमध्येही दिसत आहे. (Asian Games 2023)
A formidable 9️⃣-wicket win over Bangladesh and #TeamIndia are through to the #AsianGames Final! 👏🏻👏🏻
Scorecard ▶️ https://t.co/75NYqhTEac#IndiaAtAG22 pic.twitter.com/SsRVenSNmu
— BCCI (@BCCI) October 6, 2023
कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. पण, सलामीवीर परवेझ इमान सोडला तर आघाडीच्या फळीला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. याचं श्रेय युवा गोलंदाज साई किशोर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना द्यावं लागेल. परवेझ इमॉनने २३ धावा केल्या. पण, त्यानंतर मुहमुद्दुल हसन (५), सैफ हसन (१), झाकिर हसन (०), अफिफ हसन (७) आणि शहादत हुसेन (५) हे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज जाकर अलीने सर्वाधिक २४ धावा करत बांगलादेशला निदान शंभर धावांच्या जवळ आणलं. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरने १५ धावांमध्ये २ तर साई किशोरने १२ धावांमध्ये ३ बळी टिपले. बांगलादेशच्या संघाने निर्धारित २० षटकांत ९ गडी बाद ९६ धावा केल्या. (Asian Games 2023)
(हेही वाचा – Allahabad High Court On Hindu Marriage : सप्तपदीशिवाय विवाह बेकायदेशीर – अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
तिलक वर्मा, ऋतुराजची फटकेबाजी
बांगलादेशच्या धावसंख्येला उत्तर देताना यशस्वी जयसवाल भोपळा न फोडता बाद झाला. पण, बांगलादेशला हे एकमेव यश मिळालं. त्यानंतर तिलक वर्मा आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी फटकेबाजी करत ९ षटकं आणि २ चेंडूंमध्ये हे आव्हान पार केलं. तिलक वर्माने २६ चेंडूत ५५ धावा करताना ६ षटकारांची आतषबाजी केली. तर ऋतुराजने २६ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. (Asian Games 2023)
दुसरा उपान्त्य फेरीचा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान थोड्या वेळात होणार आहे आणि यातील विजेत्या संघाबरोबर भारत अंतिम सामना खेळेल. यापूर्वी महिला क्रिकेट संघाने आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पटकावलं आहे. किंबहुना या स्पर्धेतील भारताने मिळवलेलं हे पहिलं सुवर्ण होतं. आता पुरुषांच्या संघाकडेही ती संधी आहे. (Asian Games 2023)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community