ऋजुता लुकतुके
भारतीय हॉकी संघासाठी शुक्रवारचा (६ ऑक्टोबर) दिवस भारतीय हॉकी संघासाठी दुहेरी यश घेऊन आला. हरमनप्रीत सिंगच्या संघाने आपल्या तडाखेबंद खेळाने जपानचा ५-१ असा मोठ्या फरकाने पराभव केला. आणि त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही मिळवली. तब्बल ९ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने असं सुवर्ण यश या स्पर्धेत पाहिलं. यापूर्वी आशियाई खेळात भारताने सुवर्ण जिंकलं होतं ते २०१४ मध्ये. भारताची इतर दोन सुवर्ण तर १९६६ आणि १९९८ ची आहेत. दक्षिण कोरियाने चीनचा २-१ असा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. (Asian Games 2023 )
अंतिम सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक होता. हरमनप्रीतने (३२ व ५९ मिनिट) पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले. तर अमित रोहिदासने ३६व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोनं केलं. इतर दोन गोल मनप्रीत सिंग (२५वं मिनिट) आणि अभिषेक (४८ वं मिनिटं) हे मैदानी होते.जपानसाठी सरेन तनाकाने एकमेव गोल केला तो ५१ व्या मिनिटाला. हरमनप्रीत सिंगने भारतासाठी या स्पर्धेत सर्वाधिक १३ गोल केले. तर स्ट्रायकर मनदीपने १२ गोल केले. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला. आणि साखळी फेरीतही त्यांनी जपानचा ४-२ असा पराभव केला होता. मैदानाच्या दोन्ही बाजूंनी आक्रमक चाली रचण्यात भारतीय संघ यशस्वी झाला. (Asian Games 2023 )
(हेही वाचा : Night Landing Of Helicopters : गडचिरोलीमध्ये हेलिकॉप्टरचे नाईट लॅंडिग होणार; गृहमंत्र्याचे आश्वासन)
सामना सुरू झालेल्या क्षणापासून भारतीय संघाने आक्रमण सुरू केलं होतं. पाचव्याच मिनिटाला ललित उपाध्यायने पहिला प्रयत्न केला. पण, हा गोल जपानी गोलीने बरोबर अडवला. त्यानंतरही सातत्याने पेनल्टी कॉर्नर मिळवण्यात संघ यशस्वी होत होता. पण, पहिला गोल झाला तो २५ व्या मिनिटाला. मनदीप सिंगने हा देखणा मैदानी गोल केला. स्पर्धेच्या प्रत्येक क्वार्टरवर भारताचंच वर्चस्व होतं. आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेता भारतीय संघ चेंडूवर नियंत्रण ठेवून होता. अखेर जपानने सामन्याला दहा मिनिटं उरली असताना एकमेव गोल केला. (Asian Games 2023 )
हेही पहा –