रस्ते अपघात कमीत कमी व्हावेत यासाठी वाहन निर्मिती (Vehicle manufacturing) करणाऱ्या कंपन्यांकडून सुरक्षा सुविधा दिल्या जातात. त्याआधारे वाहनांना ‘स्टार रेटिंग’ दिले जाते. सध्या देशातील वाहन निर्मिती कंपन्यांना यूकेतील ‘ग्लोबल इनकॅप’ संस्थेद्वारे चाचणी करून सुरक्षा प्रमाणपत्र दिले जाते, पण आता वाहनांची ही सुरक्षा चाचणी (Safety Testing New Vehicles) भारतातच होणार आहे.
बुधवारपासून चाकणमधील एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया) (Automotive Research Association of India) आणि दिल्लीतील आयसीएटी (इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी) (International Center for Automotive Technology) या दोन संस्था ही चाचणी करणार आहेत. चाचणीनंतर या दोन संस्थांकडून भोसरीतील केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेला (सीआयआरटी) अहवाल दिला जाईल. त्याआधारे वाहनांचे स्टार रेटिंग केले जाईल. यासाठी ग्लोबल इनकॅप आणि सीआयआरटी यांच्यात करार झाला आहे.
याबाबत सीआयआरटीचे संचालक डॉ. टी सूर्यकिरण यांनी सांगितले की, सध्या क्रॅश चाचणीसाठी वाहने परदेशात पाठवावी लागतात. तिथे अशी चाचणी करण्याचा खर्च जास्त आहे, पण आता भारताची क्रॅश चाचणी भारतातच होणार आहे. यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांचा खर्च कमी होईल.
वाहनांची चाचणी कशी होणार…
वाहनांच्या समोर आसनावर डमी चालक आणि सहप्रवासी बसवून गाडी समोरच्या बाजूने धडकवली जाईल. यानंतर कोणास किती इजा झाली, याआधारे वाहनाची सुरक्षितता तपासली जाईल. वाहनांमध्ये सुरक्षिततेसाठी एअरबॅग, सेफ्टी बेल्ट, बॅक सेन्सर, कॅमेरा, स्पीड अलर्ट आणि बसविले जातात, पण अपघाताच्या वेळी ते काम करतात का याचीही चाचणी केली जाईल.
स्टार रेटिंगचे नियम …
सुरुवातीच्या टप्प्याला या चाचण्या ऐच्छिक असणार आहेत. वाहन निर्माता कंपन्यांना चाकण येथील आयआरएआय आणि दिल्लीतील आयसीएटी या दोन संस्थांकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर मोटारी संस्थेकडे कराव्या लागतील. वाहनांना शून्य ते पाच स्टार दिले जातील. याची चाचणी तीन स्तरावर होईल.