- ऋजुता लुकतुके
बॅडमिंटन दुहेरीतील भारताची आघाडीची जोडी सात्त्विक साईराज आणि चिरागला आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) ऐतिहासिक सुवर्ण खुणावतंय. ही जोडी अंतिम फेरीत पोहोचलेली पहिली जोडी आहे. सात्त्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी (sattwik Sairaj and Chirag shetty ) ही बॅडमिंटनमधील भारताची दुहेरीची जोडी तशीही यंदा चांगल्याच फॉर्ममध्ये आहे आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी शुक्रवारी आपला सर्वोत्तम खेळ पेश केला. उपान्त्य फेरीत या भारतीय जोडीने मलेशियाच्या एरॉन शिया आणि सॉ वाय यिक (Aaron Shea and Saw Yick) या जोडीचा २१-१७ आणि २१-१२ असा ४६ मिनिटांत पराभव केला.
मलेशियन जोडी टोकयो ऑलिम्पिकमधील कांस्य विजेती जोडी आहे. पण, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्त्विक आणि चिराग जोडीने त्यांना जराही जुमानलं नाही. आपल्या आक्रमक खेळाने त्यांनी सामन्यावर पकड बसवली. आणि खासकरून दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीला डोकंही वर काढण्याची संधी दिली नाही. बॅडमिंटनमध्ये भारताने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक दिली आहे.
SATWIK-CHIRAG HAVE DONE IT 🤩🇮🇳
📸: @badmintonphoto @himantabiswa | @sanjay091968 | @lakhaniarun1 #TowardsAsianGlory#AsianGames2022#AsianGames#TeamIndia#IndiaontheRise#BadmintonTwitter#Badminton pic.twitter.com/mCCSfT6Yi9
— BAI Media (@BAI_Media) October 6, 2023
आता अंतिम फेरीत भारतीय जोडीचा मुकाबला असेल तो चॉई सो यू आणि किम वॉन हो या कोरियन जोडीशी. आज उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने कमाल केली. सुरुवातीला दोन्ही जोड्या सावध खेळत होत्या. १०-१० अशी बरोबरीही होती. पण, त्यानंतर फटक्यांची अचूकता आणि जोरदार स्मॅशेस यांच्या जोरावर सात्त्विक आणि चिरागने विजय साध्य केला. खासकरून चिरागचा खेळ आज जास्त बहरला.
आजच्या खेळात सात्त्विक बचावाची भूमिका पार पाडत होता, तर चिराग आक्रमक होता. दोघांनीही एकमेकांमध्ये चांगला समन्वय दाखवला. आणि मैदान कव्हर करताना चपळाईही दाखवली. त्याच्या जोरावरच दोघांनी स्पर्धेत ही मजल मारली आहे. पुरुषांच्या एकेरीत एच एस प्रणॉयला मात्र उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. ऑल इंग्लंड विजेता आणि सध्याचा क्रमवारीतील क्रमांक एकचा चिनी खेळाडू ली शिंग फेंगने प्रणॉयला २१-१६ आणि २१-९ ने हरवलं.
(हेही वाचा – Bangladeshi : मुंबईत बांगलादेशी घुसखोर वाढले, कांदिवलीत तिघांना अटक )
प्रणॉय या स्पर्धेत पाठदुखीसह खेळला. शिवाय उपउपान्त्य फेरीतील त्याचा सामना ३ गेमपर्यंत चालला. त्यामुळे त्याचे पायही थकले होते. फक्त ५० टक्के तंदुरुस्तीसह खेळलेल्या प्रणॉयने प्रतिकार करण्याचा केलेला प्रयत्न शेवटी तोकडा पडला. दुसऱ्या गेममध्ये त्याला धावताही येत नव्हतं. पाठदुखीमुळे प्रणॉय सांघिक स्पर्धेतही खेळला नव्हता. पण, एकेरीत त्याची सुरुवात चांगली झाली आणि त्याने भारताला ४१ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेतील पदक मिळवून दिलं.
यंदा भारतीय बॅडमिंटनपटूंनी आशियाई क्रीडास्पर्धेत ३ पदकं मिळवली आहेत. सांघिक प्रकारात पुरुषांच्या संघाने रौप्य मिळवलं. तर एच एस प्रणॉयला पुरुषांच्या एकेरीत कांस्य पदक मिळालं आहे. आता पुरुषांच्या दुहेरीत सात्त्विकसाईराज आणि चिराग ही जोडी शनिवारी अंतिम फेरीत खेळेल. त्यांना ऐतिहासिक सुवर्ण जिंकण्याची संधी आहे.
Join Our WhatsApp Community