छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजीपार्क येथील अनधिकृत प्राणिसंग्रहालयातील अजगर, मगर आणि धामण हे आसपासच्या परिसरात आढळून आल्यामुळे येथील प्राणिसंग्रहालय बंद करण्याची मागणी होऊ लागली असून आता हे प्राणिसंग्रहालयच बंद करून त्या परिसराची स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. या प्राणिसंग्रहालयाला वन विभागाने नोटीस जारी करून प्राणिसंग्रहालय सुरु करण्याबाबत आपल्याकडे रितसर परवानगी आहे का याची विचारणा केली आहे. त्यानंतरच शनिवारी या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना इतरत्र हलवून त्या परिसराची स्वच्छता राखली जात असल्याचे दिसून आले आहे. (Dadar Zoo)
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर महात्मा गांधी तरण तलावाशेजारील मोकळ्या जागेत नंदकुमार मोघे यांनी प्राणिसंग्रहालय निर्माण करून याठिकाणी काही सरपणारे प्राणी तसेच पक्षी आणि जलचर प्राणी याठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवले आहेत. या प्राणिसंग्रहालयातील सरपटणाऱ्या प्राण्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्याने त्यांच्याकडून सुटून गेलेल्या अजगराचे पिल्लू मोठे झाल्याने ते काही दिवसांपूर्वी बाजुच्या जलतरण तलावाच्या परिसरात आढळून आले. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीच या तरण तलावामध्ये मगरीचे पिल्लू आढळून आले. ही घटना ताजी असताना शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या परिसरात धामण जातीचा साप आढळून आला. यापूर्वीचा अजगर आणि मगरीचे पिल्लू हे त्या अनधिकृत प्राणिसंग्रहालयातून आल्याचे पुरावे देत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आरोप केला होता. त्यामुळे धामण जातीचा सापही याच ठिकाणांहून आल्याचीही दाट शंका उपस्थित केली जात आहे. (Dadar Zoo)
यासर्व पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ प्रोटेक्ट ऍक्टनुसार वन विभागाने या प्राणिसंग्रहालयाचे संचालक मोघे यांना नोटीस पाठवून हे प्राणिसंग्रहालय चालवण्यासंदर्भात आपल्याकडे परवानगी आहे का या बाबतची विचारणा केली आहे. याबाबतचे स्पष्टीकरण संचालकांच माध्यमातून वन विभागाला देण्याची प्रक्रिया सुर आहे. दरम्यान, शनिवारी या प्राणिसंग्रहालयातील प्राणी इतरत्र हलवून त्या भागाची पूर्णपणे साफ सफाई करण्यात आली आहे. या सफाई अंतर्गत येथील अडगळीतील सर्व कचरा साफ करण्यात आला आहे. तब्बल एक ट्रकभर कचरा व इतर साहित्य हटवून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. (Dadar Zoo)
(हेही वाचा – Air India Reveals First Look : एअर इंडियाच्या विमानाचा ‘झक्कास लूक’; टाटा समुहाने बदलले रूपडे)
यापूर्वी मार्च महिन्यात वन विभागाने या प्राणिसंग्रहालयात पक्षांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्याने अनधिकृतपणे प्राण्यांची देखभाल केल्याप्रकरणी त्यांना नोटीस दिली होती. विदेशी साप आणि विदेशी कोळी आढळून आल्याने हे प्राणी त्यांनी जप्त केले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा या प्राणिसंग्रहालयाला वन विभागाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर या परिसराची संपूर्णपणे साफसफाई करण्यात आली आहे. दरम्यान, येथील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्व प्राणि व पक्षी अन्य जागेत नेण्यात आले असून या भागाची संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर पुन्हा एकदा लोकांना चांगल्याप्रकारे हे प्राणी व पक्षी पाहता येईल. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना हे प्राणिसंग्रहालय बंद असल्याने निराश होऊन परतावे लागले, परंतु हे प्राणिसंग्रहालय लवकरच पुन्हा सुरु होईल, असे तेथील कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांना सांगण्यात येत होते. (Dadar Zoo)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community