क्रिकेट विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा पाचवा सामना रविवारी (८ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला जात आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघातील फिरकीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या रवींद्र जडेजाने तर यावेळी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच फिरकीच्या तालावर नाचवले आणि फक्त २८ धावांत तीन बळी मिळवले. जडेजाला यावेळी कुलदीप यादव आणि आर. अश्विन यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येवर लगाम लावता आला आणि त्यांना १९९ धावांत रोखले. त्यामुळे भारताला आता २०० धावांचे गरज आहे. (World Cup 2023)
जसप्रीत बुमराने यावेळी ऑस्ट्रेलियाला मिचेल मार्शच्या रुपात पहिला धक्का दिला. विराट कोहलीने त्याची भन्नाट कॅच पकडला आणि भाेपळा न फोडता तो बाद झाला. त्यानंतर काही काळ डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांची चांगली भागीदारी झाली. पण कुलदीप यादवने आपल्याच गोलंदाजीवर वॉर्नरला झेलबाद केले. वॉर्नरने यावेळी सहा चौकारांच्या जोरावर ४१ धावा केल्या. वॉर्नर बाद झाला तरी स्मिथ हा दमदार फलंदाजी करत होता. पण जडेजाने त्याला क्लीन बोल्ड केले आणि भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. स्मिथने यावेळी ५ चौकारांच्या जोरावर ४६ धावा केल्या. स्मिथ बाद झाला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. कारण त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताने त्यावेळी गोलंदाजीची पकड मजबूत केली आणि त्यामुळे त्यांना ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला खीळ बसवता आली.