BJP : भाजपाला हवी बारामती !

अजित पवार चिंतेत; सुप्रिया सुळेंना पराभूत करून पवारांना शह देण्याची रणनीती

122
BJP : भाजपाला हवी बारामती
BJP : भाजपाला हवी बारामती
  • सुहास शेलार

बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) काबिज करून शरद पवारांना शह देण्याचे भाजपाचे कित्येक वर्षांचे स्वप्न; परंतु आजवर ते सत्यात उतरले नाही. आधी मोठे पवार, त्यानंतर अजित पवार आणि पुढे सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला. आता राष्ट्रवादीतील फुटीनंतर या मतदारसंघातील गणिते पूर्णतः बदलली असून, भाजपाच्या (BJP) आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांनी अजित पवारांकडे थेट राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याची मनसबदारी मागितल्यामुळे ते चिंतेत आहेत. केवळ राजकीय फायद्यासाठी भगिनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात काम केल्यास पुढे राज्यभरातील कार्यकर्त्यांना कसे सामोरे जायचे, असा पेचही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीचा कणा असलेल्या शरद पवारांवर राजकीय प्रहार करण्यासाठी भाजपाने खास नियोजन केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांची फौज बारामतीत तळ ठोकून आहे. दर सहा महिन्यागणिक सर्व्हे केले जात आहेत. केंद्रातले वरिष्ठ मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि प्रमुख नेते सातत्याने बारामतीचे दौरे करीत आहेत. त्यात आता पवारांचे पुतणेच भाजपाला येऊन मिळाल्याने त्यांची वाट सोपी झाली आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत. हे पक्के झाल्यानंतर भाजपाने कांचन कूल यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत तसेच कौटुंबिक मोहात न अडकता युतीधर्माचे पालन करण्याची सूचना अजित पवारांना केंद्रीय नेत्यांनी केली आहे.

पवारांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंचा पराभव शक्य आहे का? चार महिन्यांपूर्वी याचे उत्तर नाही असेच होते. कारण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघावर पवार कुटुंबियांचे एकहाती वर्चस्व होते. दौंड आणि खडकवासला वगळता अन्य चारही विधानसभा क्षेत्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आमदार असल्याने सुळेंच्या विजयाची वाट सोपी होती. आता मात्र अजित पवार भाजपाच्या तंबूत विसावल्यामुळे त्यांची अडचण झाली आहे.

प्राप्त परिस्थितीत शरद पवार गटाचा एकही आमदार बारामती लोकसभा क्षेत्रात नाही. दौंड- राहुल कूल (भाजपा), खडकवासला- भिमराव तापकीर (भाजपा), पुरंदर- संजय जगताप (कॉंग्रेस), भोर- संग्राम थोपटे (कॉंग्रेस), इंदापूर- दत्तात्रय भरणे (अजित पवार गट) आणि बारामतीमधून स्वतः अजित पवार आमदार आहेत. गेल्या वेळी बारामती विधानसभेतून सुळे यांना १ लाख मतांची लीड मिळाली होती. आता बदललेल्या गणितांमुळे सुळे यांचा पराभव शक्य असल्याचा विश्वास भाजपाला आहे.

‘पॉवर’ कुणाची? 
खासदार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक नियोजन गेल्या निवडणुकीपर्यंत पूर्णपणे अजित पवारांच्या हातात होते. सुळे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरील निवडणुकांची उमेदवारी देणे, त्यांच्या नियुक्त्या करणे, स्थानिक संस्थांतील पदाधिकारी निवडणे, या कशातच लक्ष न घालता सर्व अधिकार हे अजित पवार यांनाच दिले होते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये गावोगावी अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत. अशावेळी लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा काळ शिल्लक असताना मतदारसंघ पुन्हा नव्याने कसा बांधायचा, हा मोठा प्रश्न सुप्रिया सुळे यांच्यासमोर आहे.

मोठ्या पवारांचा प्लॅन काय?
भाजपाच्या आव्हानांकडे काणाडोळा न करता शरद पवार यांनीही सावध पवित्रा घेतला आहे. बारामतीत भाजपाने उभे केलेले आव्हान परतून लावण्यासाठी त्यांनी महादेव जानकर यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. त्या दिशेने संवाद मालिका सुरू झाली असून; ही मदत छुपी असावी की उघड याविषयी निर्णय होणे अद्याप बाकी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. त्यात जानकर यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जानकर यांची साथ मिळाल्यास सुप्रिया सुळेंच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील, असा विश्वास पवार यांना आहे.

…म्हणून जानकरांची साथ महत्त्वाची

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते.
या निवडणुकीत सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२, तर महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती.
म्हणजे सुप्रिया सुळे यांना जानकरांपेक्षा केवळ ६९ हजार अधिक मते मिळाली होती. जानकर भाजपाच्या तिकिटावर लढले असते, तर विजय निश्चित होता, असा निष्कर्ष त्यावेळेस काढण्यात आला होता.
२०२४ च्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वशक्तीनिशी उतरण्याचे नियोजन भाजपाने केले असताना जानकर मैदानात उतरल्यास ते सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडणार आहे.
कारण जानकरांमुळे भाजपाची मदार असलेल्या धनगर मतांचे विभाजन होईल व कांचन कुल यांच्या मतांची टक्केवारी कमी होईल.

जानकरांचे भाजपाशी फिस्कटले का?

  • देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महादेव जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्यामुळे ते २०१९च्या लोकसभेपासून लांब राहिले. आता नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र फडणवीसांनी त्यास साफ नकार दिल्यामुळे जानकर नाराज आहेत. या नाराजीचा फायदा शरद पवार यांनी घेण्याचे ठरवले आहे. त्या बदल्यात त्यांना विधान परिषद देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. २७ जुलै २०२४ मध्ये जानकर यांची आमदारकीची मुदत संपुष्टात येणार आहे. भाजपा यावेळेस त्यांना संधी देण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ते संधीच्या शोधात आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.