News Click : चिन्यांचे हस्तक; भारताचे मारक!

    193
    News Click : चिन्यांचे हस्तक; भारताचे मारक!
    News Click : चिन्यांचे हस्तक; भारताचे मारक!

    सायली डिंगरे

    परदेशी निधी घेऊन चीनचा उदो उदो करणाऱ्या ‘न्यूज क्लिक’ या संकेतस्थळाचे संपादक प्रबीर पूरकायस्थ यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे धागे-दोरे आता गौतम नवलखा, तिस्ता सेटलवाड आणि सीताराम येचुरी यांच्यापर्यंतही पोहोचले आहेत. ज्या-ज्या ठिकाणी विदेशी निधीच्या आधारे देश पोखरण्याचे काम चालू असते, त्या-त्या ठिकाणी तिस्ता सेटलवाड हे नाव पोहोचलेले असते. न्यूज क्लिकमुळे पुन्हा उजेडात आलेल्या तिस्ता सेटलवाड यांनी विदेशी निधी घेऊन केलेल्या देशविरोधी कृत्यांवर टाकलेला प्रकाश! (News Click)
    गुजरात दंगलीच्या आडून भारताची बदनामी
    ज्या एनजीओने स्वतः मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आणि अनेक वर्षे तपास यंत्रणांची दिशाभूल केली, त्या सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस (सीजेपी)च्या तिस्ता सेटलवाड या सचिव आहेत. या एनजीओने २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीत गुजरात सरकारच्या विरोधात याचिका केली. गुजरात सरकारची जगभरात बदनामी करणे, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना काहीही करून दंगलीच्या कटात अडकवणे आणि गोध्रा घटनेतील गुन्हेगारांना संरक्षण देऊन तपासाची दिशाभूल करणे, हे तिस्ता आणि त्यांच्या एनजीओचे कारनामे आहेत.
    सर्वोच्च न्यायालयाने २४ जून २०२२ रोजी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चिट देत तिस्ता सेटलवाड यांची आणि त्यांच्या एनजीओचीच चौकशी करण्याचे आदेश दिले. तिस्ता सेटलवाड यांच्यावर २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी गुजरात पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने १०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. २५ जून २०२२ या दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्या या प्रकरणात जामिनावर आहेत.
    समाजसेवेसाठी विदेशी निधी घेऊन छानछौकी
    तिस्ता सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद यांच्या विरोधात २००७ पासून त्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध संपत्ती गोळा केल्याचे आरोप आहेत. गुजरात दंगल पीडितांच्या नावाखाली जवळपास ६ ते ७ कोटी रुपये जमा करून अपहार केला. ही रक्कम दारू आणि अन्य प्रकारे खर्च करण्यात आल्याचा आरोप तिस्ता सेटलवाड यांच्यावर आहे. त्यांनी विदेशी मुद्रा कायद्याचे उल्लंघन केले आहे तसेच २००९ मध्ये अमेरिकास्थित फोर्ड फाउंडेशनकडून त्यांच्या एनजीओसाठी दान दिलेल्या पैशांचा दुरुपयोग तिस्ता यांनी केला आहे.
    निधीचा गैरव्यवहार; ट्रस्टची नोंदणी रहित
    गृहमंत्रालयाच्या ‘विदेशी योगदान नियमन विभागा’ने तिस्ता सेटलवाड या पदाधिकारी असलेल्या ‘सबरंग ट्रस्ट’ची विदेशी योगदान नियमन कायद्याच्या अंतर्गत असलेली नोंदणी रहित केली. या संस्थेला प्राप्त झालेल्या विदेशी निधीपैकी ५० टक्क्यांहून अधिक निधी कायद्यानुसार संमती नसतांनाही प्रशासकीय कारणांवर खर्च करण्यात आला. या संस्थेने ट्रस्टला मिळालेला निधी ‘कम्युनलीझम काँबॅट’ हे मासिक प्रसिद्ध करण्यासाठी वापरला तसेच ट्रस्टकडे असलेला निधी, त्याच संचालक असलेल्या आणि तोच कार्यालयीन पत्ता असलेल्या एका आस्थापनाकडे वळवला. ज्या कारणासाठी ‘सबरंग ट्रस्ट’ची नोंदणी करण्यात आली, त्या व्यतिरिक्त अन्य कारणांसाठी विदेशी निधी वापरला.
    न्यूजक्लिकच्या माध्यमातून चिनी पैसा
    चीनकडून न्यूजक्लिकला मिळालेले पैसे तिस्ता सेटलवाड यांनाही मिळाले आहेत. त्यांचे पती जावेद आनंद यांना १२.६१ लाख रुपये मिळाले आहेत. तिस्ता सेटलवाड यांची मुलगी तमारा हिला १०.९३ लाख रुपये मिळाले.
    काँग्रेस, इस्लामी राष्ट्रे यांच्याकडूनही पैसे
    वर्ष २००२ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलीमध्ये तेथील सरकारला अस्थिर करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत अहमद पटेल यांनी तिस्ता सेटलवाड यांना ३० लाख रुपये दिल्याचे प्रतिज्ञापत्र गुजरातच्या विशेष अन्वेषण पथकाने सत्र न्यायालयात सादर केले. तिस्ता यांच्यावर देशातील आघाडीच्या तपास यंत्रणांनी पुराव्यांसहित आरोप केले आहेत.
    सर्वांची फसवणूक
    गुजरात दंगलीत मदिनाबीबी या मुसलमान महिलेवर बलात्कार झालेला नसताना तिच्याकडून खोटे प्रतिज्ञापत्र सिद्ध करून ते न्यायालयात सादर केले. हे नानावटी आयोगासमोर उघड झाले, तसेच तिस्ताकडे काम करणारा तिचा सहकारी रईस पठाण याने तर तिच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्याशी तिस्ता सेटलवाड यांची भेट झाली होती. स्वयंसेवी संस्थेला मिळणाऱ्या निधीपैकी २५ टक्के निधी तरी पीडितांसाठी खर्च करण्यास तिस्ताला सांगितले होते. बेस्ट बेकरी प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार यास्मिन बानू आणि जहिरा शेख यांनीही ‘आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी तिस्ता सेटलवाड यांनी त्यांना हवी तशी साक्ष देण्यासाठी दबाव आणला’, असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला होता.
    ज्या महिलेचे असे कारनामे आहेत, त्या तिस्ता सेटलवाड यांना काँग्रेस सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. काँग्रेसने तिस्ता सेटलवाड यांना राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्यही बनवले होते. या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचा दर्जा मंत्रिमंडळापेक्षाही वरचा होता. ज्या-ज्या वेळी विदेशी शक्तींना भारतात काही देशविरोधी वातावरण निर्माण करायचे असते, त्या-त्या वेळी अमेरिका, चीन अशा वेगवेगळ्या देशांतील यंत्रणा तिस्ता सेटलवाड यांच्यापर्यंतच कशा पोहोचतात, हे आश्चर्यकारक आहे. गुजरात दंगल प्रकरणात अडकूनही आणि कारागृहाची हवा खाऊनही तिस्ता यांच्या या कारवाया अजूनही चालू आहेत. त्यांची देशविरोधी कारवाया करण्याची खुमखुमी अजून जिरलेली नाही. सरकारने आता अनेक पातळ्यांवर देशविरोधी शक्तींच्या विरोधात मोहीम चालू केली आहे. तर तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्यासारख्या देश पोखरणाऱ्या शक्तींनाही कायमचे नेस्तनाबूत करावे!

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.