सायबर गुन्हेगारांच्या टोळक्याने पेमेंट गेटवे सेवा (Payment gateway account hacked) पुरवणाऱ्या कंपनीचे बँक खाते हॅक (Bank Account Hack) करून वेगवेगळ्या बँक खात्यांतून १६ हजार १८० कोटींचे व्यवहार केले आहेत, तर २५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. ठाणे सायबर विभागाने याप्रकरमी ६ ऑक्टोबर २०२३ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने याप्रकरणी संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तिविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी जितेंद्र पांडे याने आठ ते दहा वर्षे बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असून भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
एका अज्ञात व्यक्तीने सेफेक्स पे आउट कंपनी सॉफ्टवेअर हॅक करून २५ कोटी रुपयांचा अपहार केला. त्यामुळे कंपनीच्या तक्रारीवरून ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाण्याच्या सायबर सेलमार्फत करण्यात येत आहे. हा तपास सुरू असताना फसवणुकीच्या २५ कोटींपैकी १ कोटी ३९ लाख १९ हजार २६४ एवढी रक्कम रियाल इंटरप्रायजेसच्या नावे असलेल्या एचडीएफसीच्या बँक खात्यात वळती झाल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी दिली आहे.