Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहली आणि राहुलने वाचवलं, संघातील ४ जमेच्या बाजू आणि कच्चे दुवे 

एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. पण, विराट आणि राहुल यांची भागिदारी जमली नसती तर कदाचित भारताची आणखी दमछाक झाली असती. कालच्या विजयानंतर पाहूया भारतीय संघाच्या ४ जमेच्या बाजू आणि ४ कच्चे दुवे

152
Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहली आणि राहुलने वाचवलं, संघातील ४ जमेच्या बाजू आणि कच्चे दुवे 
Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहली आणि राहुलने वाचवलं, संघातील ४ जमेच्या बाजू आणि कच्चे दुवे 

ऋजुता लुकतुके

कधी कधी शत्रूसाठी विणलेल्या जाळ्यात आपण स्वत:च अडकतो, तसं भारतीय संघाचं होतंय की काय असं चेन्नईत वाटत होतं. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात ओढायचं म्हणून मायदेशातील खेळपट्टी आपल्या खेळाडूंना पोषक बनवून घेतली. पण, आपल्या आघाडीच्या फळीनेच घात केला, अशी अवस्था भारतीय संघाची होती दुसऱ्याच षटकांत संघाची ३ बाद २ अशी स्थिती झाली तेव्हा.

विजयासाठी २०० धावांचं लक्ष्य तसं कमीच होतं. पण, स्टार्क आणि हेझलवूडसमोर ते ही मोठं वाटायला लागलं होतं. अखेर विराट कोहली आणि के एल राहुल यांनी भारताला वाचवलं. शतकी भागिदारी करत भारतीय संघाला विजयही मिळवून दिला. स्पर्धेची सुरुवात विजयाने आणि ती ही ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघा विरुद्धच्या, त्यामुळे भारतीय ड्रेसिंग रुम सध्या आनंदात असणार.

पण, पुढच्या सामन्याची तयारी करताना काही गोष्टींचा विचार संघ प्रशासन नक्की करत असणार. कारण, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील मोहीम ही तब्बल दीड महिन्यांची आहे. आणि इथं विजयात सातत्य महत्त्वाचं आहे. आपण पाहूया कालच्या विजयानंतर भारतीय संघाच्या समोर आलेल्या जमेच्या बाजू आणि कच्चे दुवे, आधी जमेच्या बाजूंनी सुरुवात करूया.

(हेही वाचा-India China Dispute : भारत चीन वाद सोडवण्यासाठी भारताने उचलले ‘हे’ पाऊल)

१. के एल राहुलची तंदुरुस्ती आणि फॉर्म 

विश्वचषक स्पर्धेत लोकेश राहुल सहभागी होईल की नाही, झाला तर यष्टीरक्षण करेल का, असे प्रश्न मागच्या दोन महिन्यांत सातत्याने विचारले जात होते. तो आणि श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीची काळजी त्या दोघांनी केली नाही, इतकी मीडिया करत होती.

पण, अखेर आशिया चषकातच के एल राहुल भारतीय संघात परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धही तो खेळला. आणि यात आपली फलंदाजीची लय अजिबात बिघडली नसल्याचंच त्याने दाखवून दिलं. पुनरागमनाच्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध त्याने खणखणीत १११ धावा केल्या आणि तिथून पुढे कालचं धरून त्याने तीन अर्धशतकं केली आहेत. यष्टीरक्षण करणारा इतका सक्षम आघाडी फळीतील फलंदाज पुन्हा दमदार कामगिरी करतोय यापेक्षा भारतीय संघासाठी जमेची बाजू ती कुठली. शिवाय चेन्नईच्या प्रचंड थकवणाऱ्या उकाड्यात काल राहुलने ५० षटकं यष्टीरक्षणही केलं.

२. न संपणारी फलंदाजांची रांग 

काल भारतीय संघाची अवस्था ३ बाद २ होती आणि कोहली तसंच राहुलचा जमही बसायचा होता, तेव्हाही आयसीसीने सुरू केलेला मॅच प्रेडिक्टर (विजयाचं भाकीत वर्तवणारी यंत्रणा) विजयाचं माप ५५ टक्क्यांनी भारताच्याच पारड्यात टाकत होता. मॅच प्रेडिक्टर हा काही मापदंड नाही. आणि प्रेक्षकांनी व्यक्त केलेला तो फक्त अंदाज आहे. पण, इथं मुद्दा हा की, अशा बिकट परिस्थितीतही भारतीय संघच जिंकेल, असं चाहत्यांना वाटत होतं ते फलंदाजांवरील विश्वासामुळे.

रोहीत, ईशान आणि श्रेयस बाद झाले असले तरी विराट कोहली, लोकेश राहुल,  हार्दिक पांड्या, रवी जाडेजा आणि रवी अश्विन फलंदाजीत हातभार लावतील. आणि भारतीय विजय शक्य होईल असा तो विश्वास होता. फलंदाजीची ही फळी आठव्या क्रमांकापर्यंत पसरलीय. आणि तळाचा जसप्रीत बुमराही गरज पडल्यास उपयुक्त ठरू शकतो. कालचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना कमी धावसंख्येचा झाला. पण, एरवी विश्वचषकातील इतर सामने हे प्रसंगी ४०० पेक्षा जास्त धावांचे झाले आहेत. आणि अशावेळी फलंदाजांची ही लंबी फळीच भारताला साथ देणार आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतानाही या फळीने सातत्य दाखवावं एवढीच आता चाहत्यांची अपेक्षा असेल.

३. फिरकीतील पर्याय 

कालची चेन्नईची खेळपट्टी ही भारतीय गोलंदाजांची ताकद ओळखून केलेली होती याबद्दल वाद नाही. म्हणून तर पहिल्या दहा षटकांतच दोन्ही संघांना आपल्या फिरकी गोलंदाजांना खेळवावं लागलं. भारतीय संघ आपल्या यजमानपदाचा इतका फायदा तरी घेणारच.

पण, भारतीय संघातील फिरकी गोलंदाजांनी चांगल्या खेळपट्टीचा पुरपूर लाभ मिळवला हे ही महत्त्वाचं. आणि त्यासाठी फिरकीतही लागणारी विविधता भारतीय संघात होती. फलंदाजांच्या फळीमुळे ३ फिरकी गोलंदाज भारतीय संघ खेळवू शकला. आणि शेवटी ॲडम झंपा आणि ग्लेन मॅक्सवेलच्या तुलनेत कुलदीप, जाडेजा आणि अश्विन कितीतरी सरस ठरले. या तिघांनीच ऑस्ट्रेलियाचे ६ बळी मिळवले. आणि मधली फळी कापून काढली.

अश्विनचे ऑफ-स्पिन डावखुऱ्या फलंदाजांना त्रास द्यायला सक्षम होते. जाडेजाचे हवेत वेग घेणारे डाव्या हाताने फेकलेले चेंडू काल यशस्वी ठरले. तर कुलदीप मूळातच भारताचा सध्याचा नंबर वन फिरकी गोलंदाज आहे. आणि नवनवीन प्रयोग यशस्वी करण्याचा हातखंडा त्याच्याकडे आहे. चेन्नईत फिरकी गोलंदाजी हा दोन्ही संघातील ठळक फरक ठरला.

४. एकेरी – दुहेरी धावांसाठी लागणारा फिटनेस 

संघाची अवस्था ३ बाद २ होती तेव्हा विराट कोहली आणि के एल राहुल मैदानावर आले. राहुलला फलंदाजीची लय सापडलेली दिसत होती. पण, विराट कोहली सुरुवातीला हेझलवूडसमोर थोडासा गडबडला. विराट सारख्या आक्रमक फलंदाजांना गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं चालत नाही. त्यामुळे त्यांच्यावर फेरआक्रमण करण्याचा त्याचा सुरुवातीचा प्रयत्न होता.

त्याच प्रयत्नात वैयक्तिक १२ धावांवर असताना त्याने एक चुकीचा फटकाही खेळला होता. पण, त्याच्या नशिबाने मिचेल मार्शने हा सोपा झेप सोडला. या चुकीनंतर मात्र विराट सावरला. आणि पुढची जवळ जवळ २० षटकं दोघांनी एकेरी – दुहेरी धावांवरच भर दिला. आव्हान आटोक्यातलं होतं. २०० धावा करायच्या होत्या. मग त्या घाई करत न करता, एकेरी – दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवायचा हे दोघांना उमगलं.

परिणाम असा झाला की, दोघांची जोडी जमली. शंभर धावांची भागिदारी झाली. आणि हळूहळू ऑस्ट्रेलियन गोलंदाज थकत गेले. आणि त्यांची लयही बिघडली. भारताला हे शक्य झालं ते विराट आणि राहुलच्या तंदुरुस्तीमुळेही. दोघं तिशी ओलांडलेले पण, तंदुरुस्तीमुळे धावा पळतानाची चपळाई दाखवू शकले.

विजय नेहमीच सुखावणारा असतो. पण, त्याचवेळी डोळसपणे झालेल्या चुकांकडेही पाहावं लागतं. भारतीय संघ प्रशासनानेही काल काही चुकांची आणि त्रुटींची दखल नक्कीच घेतली असणार.

१. सलामीची समस्या

एरवी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही शुभमन गिल आणि कर्णधार रोहीत शर्माची जोडी आता जमलेली आहे. खरंतर ही जोडीही सायासाने जमली आहे. पण, दोघांपैकी शुभमन गिल काल आजारी होता म्हटल्यावर भारतीय संघाला त्याचा पर्याय लगेच मिळाला नाही.

लोकेश राहुलने यापूर्वी अशावेळी सलामी दिलेली आहे. पण, यावेळी संघ प्रशासनाने ईशान किशनवर विश्वास दाखवला. डावी-उजवी जोडी सलामीला असणं प्रशिक्षक राहुल द्रविडला मोलाचं वाटलं असेल. पण, ईशान बेजबाबदार फटका खेळून बाद झाला. मूळातच सलामीचे ३ तज्ज फलंदाज संघात असणं कधीही चांगलं. आणि तसं भारतीय संघासाठी मागच्या काही वर्षांत झालेलं नाही. त्यामुळे भारतासाठी सलामीची समस्या कायमच राहिलीय.

२.चौथ्या क्रमांकाचं अपयश 

हा विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच कर्णधार रोहीत शर्माने भारताला सुयोग्य चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मिळाला नाही, म्हणूनच संघाचा २०१९ मध्ये पराभव झाला, असं म्हटलं होतं. त्यानंतर भारताने या क्रमांकावर अनेकांना संधी दिली. त्यात श्रेयस अय्यर ६० पेक्षा जास्त धावांच्या सरासरीमुळे सगळ्यात उजवा ठरला.

मधल्या दीड वर्षांच्या पाठदुखीनंतर श्रेयस संघात परतही आलाय. पण, काल बेजबाबदार फटका खेळून तो बाद झाला. एखाद्या सामन्यावरून खेळाडूला जोखण्याची घाई करायला नको. पण, स्पर्धा जशी पुढे सरकेल, तशी चौथ्या क्रमांकाला बळकटी देण्याचं काम संघ प्रशासनाला करावंच लागेल.

३. आघाडीच्या फळीचा बेजबाबदारपणा 

भारतीय फलंदाजांना सुरुवातीपासून आपले फटके खेळायला आवडतं. आणि गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायलाही आवडतं. पण, त्या नादात चुकीचे फटके खेळून बाद झालं तर काय होतं, याचं प्रत्यंतर भारतीय संघाला काल आलेलं आहे.

रोहीत शर्मा वगळला, तर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर ‘आ बैल मुझे मार’ प्रमाणे बाद झाले. भारतीय फलंदाजांचा म्हणावा तसा कस धावांचा पाठलाग करताना अलीकडे लागलेला नाही. शिवाय इथून पुढे ही स्पर्धा मोठया धावसंख्येचीच असेल हा अंदाज नाकारता येत नाही. अशावेळी संघाला धावाची चांगली पायाभरणी करून देणं ही आघाडीच्या फलंदाजांनी जबाबदारी असणार आहे. आणि ती रोहीत, शुभमन, विराट आणि श्रेयसला पार पाडावी लागेल.

४. तेज गोलंदाजीचा वेग 

भारताकडे जसप्रीत बुमरा, महम्मद सिराज, महम्मद शामी आणि शार्दूल ठाकूर हे चार तेज गोलंदाज आहेत. हार्दिर पांड्याने हमखास ५ षटकं टाकतो. पण, यातल्या एकाचाही गोलंदाजीचा वेग ताशी १३० किमीपेक्षा जास्त नाही. स्विंग गोलंदाजीत ते माहीर आहेत. पण, वेग आणि अचूकता असलेल्या गोलंदाजीमुळे फलंदाज चकतो, ती क्षमता या गोलंदाजांमध्ये नाही. सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना ही गोष्ट उठून दिसू शकते. अर्थात, भारतीय खेळपट्ट्यांवर कदाचित ही गोष्ट तितकीशी मारक ठरणार नाही.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.