मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात सचिन वाझे याला न्यायालयीन कोठडी!

२८ दिवसांच्या एनआयए कोठडीनंतर विशेष न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

159

मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अॅंटिलीया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करुन, कट रचल्या प्रकरणी सीआययू पथकाचा तत्कालीन प्रभारी सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आता त्याला २८ दिवसांच्या एनआयए कोठडीनंतर विशेष न्यायालयाने शुक्रवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे याला मुख्य आरोपी दाखवून एनआयए या गुन्ह्यात त्याचा ताबा घेऊन अटक करण्याची शक्यता आहे.

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई पोलिस दलातील निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ठेवून, कट रचल्याप्रकरणी १३ मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने मिळालेल्या २८ दिवसांच्या एनआयए कोठडीनंतर शुक्रवारी सचिन वाझे याची एनआयए कोठडी संपली. शुक्रवारी दुपारी सचिन वाझे याला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष न्यायालयाने वाझेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाझे याने एनआयएच्या कोठडीत असताना लिहलेले पत्र बाहेर कसे व्हायरल झाले, असा एनआयएने न्यायालयात आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालायने वाझे यांच्या वकिलांना याबाबत सक्त ताकीद दिली आहे.

(हेही वाचाः ९ तासांच्या चौकशीनंतर प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयातून बाहेर! गूढ वाढले)

वाझेची प्रकृती व्यवस्थित

वाझे यांच्या भावाकडून वाझेची तब्येत ठीक नसल्याचे वारंवार सांगितले जात होते. मात्र एनआयएने सचिन वाझेचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला असून, त्यात वाझे याची प्रकृती व्यवस्थित आहे, त्यांना कुठल्याही उपचाराची गरज नसल्याचे म्हटले आहे. वाझेच्या न्यायलयीन कोठडीनंतर त्यांना तुरुंगातील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, अशी विनंती वाझे याच्या वकिलांनी न्यायालयात केली असून, न्यायालयाने ती मान्य केली आहे.

एनआयए मागणार वाझेचा ताबा?

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अगोदरच अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन याच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी सचिन वाझे असल्याचे उघड झालेले आहे. या हत्येचा तपास देखील एनआयए करत असून, सचिन वाझे याला या गुन्ह्यात मुख्य आरोपी बनवून त्याला अटक करण्यासाठी एनआयए सचिन वाझे याचा ताबा न्यायालयाकडे मागू शकते, अशी शक्यता आहे.

(हेही वाचाः काय आहे वाझेने लिहिलेल्या पत्रात? मंत्र्यांवर केले कोणते आरोप? वाचा…)

असा आहे घटनाक्रम

  • २५ फेब्रुवारी- मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार
  • ५ मार्च- स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला
  • ७ मार्च- एटीएसकडे दोन्ही गुन्हे वर्ग करण्यात आले
  • ९ मार्च- मनसुख हिरेन याच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल, मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणाचा तपास एनआयएकडे
  • १३ मार्च- रात्री सचिन वाझे याला अटक
  • १४ मार्च- वाझेला एनआयए विशेष न्यायालायाने सुनावली २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी
  • २५ मार्च- पुन्हा एनआयए कोठडीत वाढ. ३ एप्रिल पर्यंत एनआयए कोठडी
  • ३ एप्रिल- युएपीजे कायदा कलमात वाढ केल्यानंतर पुन्हा ७ एप्रिल पर्यंत कोठडीत वाढ
  • ७ एप्रिल- दोन दिवसांनी कोठडीत वाढ
  • ९ एप्रिल- १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

(हेही वाचाः २५ फेब्रुवारी ते १७ मार्च अंबानी-हिरेन प्रकरणाची संपूर्ण ‘पटकथा’…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.