ऋजुता लुकतुके
इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेविरुद्ध (Israel – Palestine Conflict) युद्ध पुकारल्यामुळे जागतिक बाजारात पुन्हा एकदा अनिश्चितेचं वातावरण पसरलं आहे. आणि या युद्धाच्या तिसऱ्या दिवशी सगळ्यात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत दिसून आला. टेक्सास इंटरमिडिएट एक्सचेंजमध्ये तेलाचे भाव ४ टक्के वर गेले आहेत. आणि सध्या ८७ अमेरिकन डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचले आहेत.
हमास संघटनेनं शुक्रवारी अचानक बेसावध असलेल्या इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर रॉकेट हल्ला केला. आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू यांनी या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर हमास विरुद्ध इस्रायल असा संघर्ष पेटला आहे. इस्त्राएलचे १,१०० नागरिक यात मारले गेले आहेत.
मध्य-पूर्वेत निर्माण झालेला तणाव आंतरराष्ट्रीय बाजारातही पसरला आहे. कारण, मध्य-पूर्वेतून जगाच्या एकूण गरजेपैकी एक तृतियांश तेलाचा पुरवठा होतो. सध्या हा पुरवठा थांबलेला नसला तरी युद्ध वाढत जाईल या भीतीने आतापासूनच तेल व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी चढ्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोन्याचे दरही वाढले आहेत.
सध्या हा संघर्ष गाझा पट्टी पुरता सीमित आहे. पण, या हल्ल्यात इराणने पॅलेस्टाईनला (Israel – Palestine Conflict) मदत केल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. आणि तसं स्पष्ट झालं तर अमेरिका, जी आता इस्रायलला फक्त शस्त्र पुरवठ्याची मदत करणार आहे, ती प्रत्यक्ष कारवाईत सहभागी होऊ शकते. त्यांनी इराणला तसा इशाराही दिला आहे. आणि युद्धाची व्याप्ती इस्रायल बाहेर वाढली तर मात्र तेल पुरवठा साखळी नक्कीच विस्कळित होईल. ही भीती सध्या सगळ्यांना जाणवत आहे. इराणमधील होरमुझ बंदरातून तेला वाहतूक युरोप आणि बाहेरच्या देशांना होते. ही साखळी तुटू शकते.
‘आंतरराष्ट्रीय बाजाराला सध्या वाटतंय की, हा संघर्ष पॅलेस्टाईन प्रांतापुरता मर्यादित राहील. पण, संघर्ष बाहेर पसरला आणि त्याचा कालावधी वाढत गेला, तर तेलावरचं संकटही वाढणार आहे. सध्या तेलाच्या किमतीत मोठे उतार चढाव होतील. बाकी काही होणार नाही. पुढचं सगळं परिस्थितीवर अवलंबून आहे,’ असं अमेरिकन संशोधन संस्था एएनझेड होल्डिंग्ज् ग्रुपमधील तंज्ज ब्रायन मार्टिन्स आणि डॅनिएल हेन्स यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
दुसरी एक शक्यता अशी आहे की, हे युद्ध लांबलं तर सुरक्षेच्या कारणावरून सौदी अरेबिया तेलाचं उत्पादन कमी करू शकतो. आणि तसं झालं तरीही तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू शकतात. या सगळ्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय वातावरण पुन्हा एकदा अनिश्चिततेचं बनलं आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जागतिक बाजारात सुरळीत तेल पुरवठ्यामुळे तेलाचे दर जवळ जवळ १० अमेरिकन डॉलर प्रती बॅरलने कमी झाले होते. आणि अशावेळी पुन्हा एकदा ही भाववाढ झाली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community