Shubman Gill : शुभमन गिल विषयी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिली महत्त्वाची बातमी 

डेंग्यूने आजारी असलेल्या शुभमन गिल विषयी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी महत्त्वाचा अपडेट दिला आहे. तो संघात परतेल की, त्याच्यासाठी बदली खेळाडू घ्यावा लागेल, पाहूया

127
Shubman Gill : शुभमन गिल विषयी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिली महत्त्वाची बातमी 
Shubman Gill : शुभमन गिल विषयी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिली महत्त्वाची बातमी 

ऋजुता लुकतुके

शुभमन गिलला (Shubman Gill) चेन्नईत रुग्णालयात भरती करावं लागलं ते केवळ खबरदारीचा उपाय म्हणून आणि आता तो चेन्नईच्या हॉटेलमध्ये परतला असल्याचं भारतीय फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. डेंग्यूतून शुभमन गिल आता सावरला असला तरी अशक्तपणा भरून निघण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. आणि त्यामुळे तो चेन्नईतच थांबला आहे. अफगाणिस्तान विरुद्धचा सामना तो खेळणार नाही, हे संघ प्रशासनाने सोमवारीच स्पष्ट केलं होतं.

‘शुभमनची तब्येत झटपट सुधारतेय. आणि बीसीसीआयचं वैद्यकीय पथक त्याची काळजी घेतंय. खबरदारी म्हणूनच त्याच्यावर सर्व प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. आता तो परत कधी खेळेल किंवा कधी पूर्णपणे तंदुरुस्त होईल हे वैद्यकीय पथकच संघ प्रशासनाला कळवेल,’ असं राठोड पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

डेंग्यूतून सावरायला किमान ७ दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शुभमन नेमका कधी संघात परतेल यावरून उलट सुलट चर्चा सध्या  सुरू आहेत.

शुभमन विषयी कर्णधार रोहीत काय म्हणाला? 

शुभमनच्या रक्तातील प्लेटलेट्स खूपच कमी म्हणजे अगदी ७०,००० च्या खाली गेल्याची एक बातमी काल आली होती. म्हणजेच त्याला चांगली विश्रांती आणि डाएटची गरज आहे. आणि आगामी पाकिस्तान तसंच बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यताही कमीच आहे.

(हेही वाचा-India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात विराट आणि नवीन उल हकमधील द्वंद्वावर सगळ्यांचं लक्ष )

अशावेळी कर्णधार रोहीत शर्माने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकारांना फारशी माहिती देण्याचं टाळलं. पण, शुभमन बद्दल तो म्हणाला, ‘शुभमन सारखा इन-फॉर्म फंलदाज संघात नसेल तर संघाची थोडी अडचणच होते. पण, इथं महत्त्वाची आहे ती शुभमनची प्रकृती आणि त्याने पूर्णपणे तंदुरुस्त होणं. तो जेव्हा मॅच फिट असेल तेव्हाच त्याने खेळावं असं मला वाटतं.’ रोहीतच्या या रोखठोक उत्तराने आणखी एका चर्चेची सुरुवात झाली आहे.

शुभमन ऐवजी बदली खेळाडू म्हणून ऋतुराज गायकवाड? 

शुभमन (Shubman Gill) आजारपणामुळे आणखी ३-४ सामने खेळणार नसेल तर भारताला बदली खेळाडू घ्यावा लागेल का, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. आणि काहींनी तर हा बदली खेळाडू कोण असेल याचीही चर्चा सुरू केली आहे. आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणारा ऋतुराज गायकवाड या खेळाडूची जोरदार चर्चा आहे. शिवाय ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ऋतुराजच्या बरोबरीने मैदान गाजवणाऱ्या यशस्वी जयसवालचीही चर्चा होतेय. बदली खेळाडू घेण्याचा निर्णय झालाच तर सलामीवीर म्हणून या दोघांचा विचार होऊ शकतो. भारतीय संघ प्रशासनाने शुभमन पूर्णपणे मॅच-फिट असल्याशिवाय त्याला खेळवणार नाही, हे स्पष्ट केलं आहे.

अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात पुन्हा इशान सलामीला? 

भारताच्या पहिल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातही शुभमन नव्हता. आणि तेव्हा भारतीय संघाने सलामीला डावखुऱ्या ईशान किशनला खेळवलं. फलंदाजीत तो चांगलाच चाचपडताना दिसला. आणि स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडखानी करत तो पहिल्याच षटकात बाद झाला.

पण, अफगाणिस्तान विरुद्ध ईशानला पुन्हा एकदा संधी मिळण्याचीच शक्यता आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी अंतिम अकरा खेळाडू तेच राहतील असा स्पष्ट संकेत दिला आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत संधाच्या रणनीतीत वारंवार बदल नकोत, असंच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचंही म्हणणं आहे.

ईशान सलामीवीर म्हणूनच येईल, असंही सुतोवाच त्यांनी केलं आहे. कारण, ईशान सलामीला झटपट बाद झाल्यावर लोकेश राहुलला बढती मिळेल का अशी चर्चा होती. शिवाय सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या राहुलला चौथ्या क्रमांकावर संधी मिळेल, अशीही चर्चा एका वर्तुळात रंगली होती. पण, कर्णधार रोहीत तसंच विक्रम राठोड यांनीही या शक्यता फारशा गांभीर्याने घेतलेल्या दिसल्या नाहीत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.