ऋजुता लुकतुके
पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लॉन टेनिसचा नवा ग्रँडस्लॅम सुरू होईल तेव्हा माजी नंबर वन खेळाडू राफेल नदाल (Rafael Nadal Returns) पुन्हा कोर्टवर परतलेला असेल. तो हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळणार असल्याचं स्पर्धेचे संचालक क्रेग टिली यांनी जाहीर केलं आहे.
३७ वर्षीय नदालच्या नावावर २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. आणि चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या मोजक्याच खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. २०२३ मध्ये तो सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत खेळला होता. दुसऱ्या फेरीतच तो बाद झाला. आणि तेव्हाच त्याचं हिप बोन दुखावल्याचं निदान झालं. त्याला हंगाम अर्धवट सोडावा लागला. त्याच्या हिप बोनवर मग शस्त्रक्रियाही करण्यात आली. आता वर्षभरानंतर त्याच स्पर्धेतून तो पुनरागमन करणार आहे.
(हेही वाचा-World Cup 2023 : भारत- पाक सामन्यासाठी दोन विशेष वंदे भारत ट्रेन, पहा काय आहे नियोजन)
ऑस्ट्रेलियन ओपनचे संचालक क्रेग टिली आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणतात, ‘आमच्याकडे एक ब्रेकिंग बातमी आहे. वर्षभरापेक्षा जास्त तो मैदानाबाहेर होता. आणि आम्ही त्याच्या संपर्कात होतो. आता त्याने आम्हाला ठोसपणे कळवलं आहे. तो पुढच्या वर्षी खेळणार आहे. आणि त्याबद्दल आम्ही उत्साही आहोत.’
नदालने गेल्यावर्षी २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन तसंच फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. नदालचं (Rafael Nadal Returns) ते विक्रमी २२ वं विजेतेपद होतं. पण, त्यानंतर जोकोविचने विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन जिंकून नदालला मागे टाकलं. जोकोविच सध्या २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांसह सगळ्यात आघाडीवर आहे.
नदालने यापूर्वीच २०२४ मध्ये निवृत्त होण्याचं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यामुळे २०२४ च्या हंगामात त्याने पुनरागमन करणं हे जास्तच महत्त्वाचं ठरतं. याचवर्षी मे महिन्यात नदालने २०२४ च्या हंगामाबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘२०२४ कदाचित माझं स्पर्धात्मक टेनिसमधील शेवटचं वर्ष असेल. आणि ते फक्त शेवटचं ठरण्यापेक्षा माझ्यासाठी स्पर्धा जिंकून देणारं ठरावं असं मला वाटतं,’ असं नदाल तेव्हा म्हणाला होता. त्याच्या पुनरागमनामुळे नदाल विरुद्ध जोकोविच अशी लढाई कोर्टवर पुन्हा रंगणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community