ICC World Cup 2023 : रोहित शर्माचं विक्रमी शतक, अफगाणिस्तानवर भारताचा मोठा विजय 

विश्वचषकातील सलग दुसरा विजय नोंदवताना भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. आणि त्याचवेळी गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. शतकवीर रोहित शर्मा भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला

160
ICC World Cup 2023 : रोहित शर्माचं विक्रमी शतक, अफगाणिस्तानवर भारताचा मोठा विजय 
ICC World Cup 2023 : रोहित शर्माचं विक्रमी शतक, अफगाणिस्तानवर भारताचा मोठा विजय 

ऋजुता लुकतुके

समोर अफगाणिस्तान सारखा तुलनेनं दुबळा संघ असतो तेव्हा प्रयत्न असतो तो मोठा विजय साकारण्याचा. भारतानेही ही संधी साधत अफगाणिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला. अफगाणिस्तानची २७२ ही धावसंख्या भारताने तब्बल १५ षटकं राखून पार केली. कर्णधार रोहित शर्माचं विक्रमी शतक आणि विराट कोहलीचं अर्धशतक यांच्या जोरावर भारताने ही कामगिरी साध्य केली.(ICC World Cup 2023)

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. हसमतुल्ला शाहिदीने केलेल्या ८० धावा आणि युवा फलंदाज अझमतुल्ला ओमारझाई याने केलेली ६० धावांची खेळी यामुळे त्यांनी २७० धावांचा टप्पाही ओलांडला. भारतीय तेज गोलंदाज जसप्रीत बुमराने चार बळी टिपले.

इथपर्यंत अफगाणिस्तानचं बरं चाललं होतं. पण, भारतीय डाव सुरू झाल्यावर आपला नितांत सुंदर नैसर्गिक खेळ करणाऱ्या रोहित शर्माला कसं रोखायचं याचं उत्तर अफगाण गोलंदाजांकडे नव्हतं. पहिल्या १५ षटकांत त्यांनी मुख्य फिरकी गोलंदाज राशीद खानलाही आणलं नाही. आणि जेव्हा तो आला तेव्हा रोहीत इतका सेट झाला होता की, राशीदच्या दुसऱ्या षटकांत रोहीतने दोन चौकार आणि १ षटकार ठोकून त्याचं स्वागत केलं.

थोडक्यात काय तर अफगाणिस्तानला सुसाट पळणारी रोहीत एक्सप्रेस थांबवता आली नाही. आणि त्यांचा पराभव नक्री झाला. रोहितने मैदानाच्या चारही बाजूला मनसोक्त फटके मारत ८४ चेंडूंमध्ये १३१ धावा केल्या. यात ५ षटकार आणि १६ चौकार होते. एक वेळ अशी होती की, रोहित चाळीशीत पोहोचला होता, तरी दुसरा सलामीवीर ईशान किशनच्या फक्त १० धावा झाल्या होत्या.

(हेही वाचा-Cabinet Approves MoU : भारत-फ्रान्स यांच्यात डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबत होणार सामंजस्य करार)

पण, नंतर ईशानने फटकेबाजीला सुरुवात केली. आणि ४७ चेंडूत ४७ धावा करून तो बाद झाला. दोघांनी १५६ धावांची वेगवान सलामी भारताला करून दिली. ईशान बाद झाल्यावर विराट कोहली मैदानात उतरला. आणि वेळेची गरज ओळखून फारशी हाणामारी न करता त्याने ५६ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. श्रेयस अय्यरही २५ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मा १३१ धावांवर राशीदच्या एका चेंडूवर चकला आणि क्लिनबोल्ड झाला. पण, त्याच्या शतकी खेळीसाठी त्यालाच सामनावीर पुरस्कार मिळाला.

रोहितच्या नावावर विश्वचषकातील विक्रम

रोहित शर्माने आपलं शतक पूर्ण केलं ते ६३ चेंडूंमध्ये. आणि त्याचबरोबर दोन महत्त्वाचे विक्रम त्याच्या नावावर लागले. विश्वचषकात (ICC World Cup 2023) सर्वात जास्त शतकं करणारा फलंदाज तो ठरला. त्याने सचिनचा विक्रम मागे टाकला. तर क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त षटकारांचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला. त्याने ख्रिस गेलचा ५५३ षटकारांना आज रोहितने मागे टाकलं.

त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतलं भारतीयानं केलेलं हे सर्वात जलद शतक ठरलं. त्यासाठी रोहितने कपिल देव यांचा १९७३ च्या विश्वचषकात केलेला विक्रमही मोडला. कपिल देव यांनी झिंबाब्वे विरुद्ध ७३ चेंडूत शतक ठोकलं होतं. रोहितचं हे ३१ वं एकदिवसीय शतक आहे. शतकांच्या यादीत आता सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह आघाडीवर आहे. तर विराट कोहली ४७ शतकांसह मागोमाग आहे. भारतासाठी आता रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विराटनेही आपल्या अर्धशतका दरम्यान टी-२० तसंच एकदिवसीय विश्वचषकात मिळून भारतासाठी सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सचिनच्या २,२७८ धावांचा विक्रम त्याने आज मागे टाकला.

श्रेयस अय्यरने आपल्या २५ धावांच्या छोटेखानी खेळीत एक षटकार ठोकला. हा षटकार १०० मीटर इतका लांब होता. जगातील कुठल्याही मैदानावर तो षटकार गणला गेला असता. आतापर्यंत या विश्वचषकातील हा सगळयात लांब षटकार ठरला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.