मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसह प्रसुतीगृहांमधील यंत्रे व उपकरणे पडून राहिल्यामुळे अनेकदा रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आता यासर्व ८,२८८ मशिन्स तसेच उपकरणांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील सर्व रुग्णालयांसह इतर रुग्णालयात तसेच प्रसुतीगृह आणि दवाखान्यांमधील मशिन्स तसेच उपकरणांची योग्यप्रकारे देखभाल करण्यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी तीन वर्षांसाठी ६२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे यासर्व उपकरणांची तसेच मशिन्सच्या देखभालीवर कोट्यवधी रुपये केल्यानंतरही ही यंत्रे बंद पडून लोकांना खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याची गरज भासणार नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC Hospital)
मुंबई महापालिकेचे एकूण ५ प्रमुख रुग्णालये, ०५ विशेष रुग्णालये, १७ उपनगरीय रुग्णालये, २८ प्रसुतीगृहे, १७५ दवाखाने, २०४ नागरी आरोग्य केंद्र असून यासाठी रुग्णांच्या सेवेसाठी विविध जैव वैद्यकीय उपकरणे तसेच यंत्रे उपलब्ध आहेत. महापालिकेच्यावतीने खरेदी केलेल्या या उपकरणे व यंत्राच्या देखभालीचा करार संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या देखभालीचा प्रश्न उपस्थित होतो. या उपकरणे व यंत्रांची योग्यप्रकारे देखभाली व दुरुस्ती होण्यास विलंब होत असल्याने अनेकदा रुग्णांना या अभावी परत जावे लागते किंवा पुढील तारीख दिली जाते. तर काही वेळा खासगी लॅबमध्ये याच्या तपासणीचे अहवाला आणण्यास सांगितले जाते. यासाठी पूर्वी वेगवेगळ्या संस्थांना नियुक्त करून याची देखभाल व दुरुस्ती केली जात असल्याने बऱ्याच वेळा त्यांचे समन्वय आणि जबाबदारी निश्चित करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे महापालिकेने यासर्व उपकरणे व यंत्रांच्या पुढील तीन वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एकाच संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदा मागवून या संस्थेची नियुक्ती केली आहे. (BMC Hospital)
(हेही वाचा – Ayodhya : अयोध्येतून बाबरचा नामोनिशाण मिटणार…)
यामध्ये एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स रे, युएसजी, व्हेंटीलेटर, एंडोस्कोप, डिफिब्रीलेटर्स, आदींना वगळून इतर उपकरणे व यंत्रांच्या वार्षिक देखभालीची जबाबदारी एकाच संस्थेवर सोपवली आहे. सर्व रुग्णालये आणि प्रसुतीगृहांसह दवाखान्यांमध्ये एकूण ८,२८८ जैव वैद्यकीय उपकरणे असून यासर्वांची देखभाल करण्यासाठी ट्रायमेड सोल्यूशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी तीन वर्षांसाठी विविध करांसह ६२ कोटी २२ लाख, २४ हजार रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. त्यामुळे वर्षाला सरासरी २० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या देखभालीमध्ये उपकरणे व यंत्रांचे सुट्टे भाग तसेच वस्तू बदली करणे आवश्यक असेल. बॅटरी, एक्स रे टयूब्स, एच टी केबल्स, मोनोब्लॉक, इमेज इंटेन्सीफायर, डिटेक्टर, फलो सेन्सर, ऑक्सीजन सेल्स, पल्स ऑक्सीमीटरला लागणारे प्रोब्स, इसीजी केबल्स, लागणाऱ्या विविध प्रकारच्या केबल्स, सर्व प्रकारचे सेन्सर आणि ट्रान्सड्युसर, सर्व प्रकारचे इलेक्ट्रोड्स, कॅसेट, स्टॅबिलायझर, कॉम्प्रेसर, मॉनीटर, युपीएस इत्यादी सुट्टे भाग तसेच वस्तू यांचा यामध्ये समावेश आहे. हे कंत्राट सन २०२३ पसून सन २०२६ पर्यंत असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (BMC Hospital)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community