१०० कोटींच्या पत्रावर दोन कोटीच्या पत्राचा उतारा!

अवघ्या दहा महिन्यांतच सचिन वाझे याने मुंबई पोलीस दलासह सरकारला देखील गोत्यात आणले. त्याच्या 'कार'नाम्यामुळे परमबीर सिंग यांना पोलीस आयुक्त पदावरून पायउतार व्हावे लागले, तर अनेक आजी माजी अधिकाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकावे लागले आहे. 

189
तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या लेटरबॉम्बने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवून दिली असतांना सचिन वाझेच्या लेटर बॉम्बमुळे त्यात आणखीनच भर टाकली. परमबीर सिंग यांच्या पत्रात राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा आरोप करण्यात आला, तर वाझे याच्या पत्रात देशमुखांवर २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दोन्ही पत्रांचा तसा संबंध बघितला, तर दोन्ही अधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना मुख्य लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. मात्र सचिन वाझेच्या पत्रात अनेकांना एक गोष्ट खटकत आहे, ती म्हणजे ज्या शिवसेनेने सचिन वाझेला मोठं केले त्याच पक्षाच्या नेत्यावर वाझेने पत्रात आरोप करून सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. हा आरोप खोटा असल्याचे, माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबध नसल्याचे शिवसेना नेते अनिल परब यांना प्रसारमाध्यमांसमोर शपथेवर सांगावे लागते, ही राजकारणातील सर्वात मोठी गोष्ट आहे.

परमबीर सिंग आणि वाझेची नियुक्ती!

१७ वर्षे पोलीस दलापासून दूर राहणारा सचिन वाझे याची मुंबई पोलीस दलात जून २०२० मध्ये पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई पोलीस दलाचे तत्कालीन पोलीस आयुक्त असतांना परमबीर सिंग यांनीच सचिन वाझेच्या नियुक्तीला हिरवा झेंडा दिला होता. सचिन वाझे यांना पोलीस दलात आणण्याची तत्कालीन आयुक्तांची धडपड, त्यानंतर त्याला मुंबई पोलीस दलाचा कणा समजला जाणाऱ्या गुन्हे शाखेत घेण्याची घाई देखील तत्कालीन आयुक्त यांनी केली होती. सचिन वाझे याला गुन्हे शाखेत घेण्यासाठी गुन्हे शाखेचे तत्कालीन सह पोलीस आयुक्त हे इच्छुक नसतांना देखील त्यांना आयुक्तांच्या आग्रहाखातर वाझेच्या गुन्हे शाखेतील नियुक्तीचा आदेश जारी करावा लागला होता. कोविड प्रादुर्भाव हे कारण दाखवून निलंबित सचिन वाझे याच्यासह ५७ निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुंबई पोलीस दलात पुनर्वसन करण्यात आले होते. वाझे सोडून या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वाटेला मात्र साईड ब्रँच आले, तत्कालीन आयुक्तांनी त्यांना महत्वाचा विभाग अथवा पोलीस ठाण्यात का घेतले नाही, अशी चर्चा पोलीस दलात रंगली होती.

अवघ्या दहा महिन्यांत वाझेने पोलीस दलासह सरकारला गोत्यात आणले!

सचिन वाझेला गुन्हे शाखेत घेतल्यानंतर गुन्हे शाखेच्या महत्वाच्या युनिटमध्ये प्रभारी म्हणून बसवण्यासाठी तत्कालीन आयुक्तांनी गुन्हेगारी गुप्त वार्ता (सीआययु) या विभागातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्याची उचलबांगडी करून या अधिकऱ्यांना कनिष्ठ असणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला सीआययुचे प्रभारी पद देण्यात आले, त्यामुळे गुन्हे शाखेतील अनेक अधिकाऱ्यामध्ये नाराजीचे सूर पसरले होते. वाझे यांचे मुंबई पोलीस दलात सुरू असलेले लाड एके दिवशी चांगलेच महागात पडणार असल्याची कुजबुज गुन्हे शाखेत सुरू झाली होती. आणि व्हायचे तेच झाले. अवघ्या दहा महिन्यांतच सचिन वाझे याने मुंबई पोलीस दलासह सरकारला देखील गोत्यात आणले. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्याचा कट रचण्यापासून ते या कार मालकांची हत्या करेपर्यंत वाझेने अनेकांना या गुन्ह्यात सामील करून घेतले होते. सचिन वाझे याच्या ‘कार’नाम्यामुळे परमबीर सिंग यांना पोलीस आयुक्त पदावरून पायउतार व्हावे लागले, तर अनेक आजी माजी अधिकाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकावे लागले आहे.

पत्रकबाजीने उडाला धुराळा!

मुंबई पोलीस आयुक्त पदावर येण्यासाठी परमबीर सिंग यांना करावी लागलेली कसरत आणि वर्षभरातच या पदावरून झालेली उचलबांगडीमुळे परमबीर सिंग नाराज झाले होते, या नाराजीतून त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना आपले लक्ष्य करून १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा बॉम्ब फोडून मुख्यमंत्री यांना लेखी पत्र लिहिले होते. या लेटरबॉम्बने सरकारलाच गोत्यात आणले आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. सध्या या १०० कोटींचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. दुसरा लेटरबॉम्ब एनआयए अटकेत असलेल्या सचिन वाझे याने टाकून राष्ट्रवादी सह शिवसेनेला गोत्यात आणले आहे. एनआयएच्या कोठडीत असतांना सचिन वाझे याने तीन पानांचे एक पत्र न्यायालयात सादर करण्यासाठी तयार केले होते, मात्र हे पत्र न्यायालयात सादर करण्यापूर्वीच व्हायरल झाले होते. या पत्रात वाझे याने पोलीस दलात घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना आपल्याकडे दोन कोटी मागितले होते, असा आरोप केला, तसेच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील काही प्रकरणात आपल्याला वसुली करण्यासाठी सांगितल्याचा आरोप केला करून राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली होती. सध्या या दोन्ही लेटरबॉम्बचा तपास सीबीआयकडून सुरू असून लवकरच या दोन्ही पत्राचा उलगडा होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.