पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) शी संबंधित एका कार्यक्रमात सांगितले की, भारत 2036 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्रांचं यजमानपद भूषवणार आहे. या खेळांना भारतात आणण्यासाठी भारत कोणतीही कसर सोडणार नाही, असा दावा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी १४१व्या आयओसी अधिवेशनाला संबोधित केले आणि चर्चेला सुरुवात केली. ४० वर्षांनंतर भारतात होणारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची परिषद ही अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जागतिक स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्याच्या देशाच्या क्षमतेचा उल्लेख केला आणि सांगितले की, ऑलिम्पिकसोबतच भारत २०२९ मध्ये युवा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. ते म्हणाले की, भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन व्हावे ही १४० कोटी भारतीयांची भावना आहे.
(हेही वाचा – Israel-Palestine Conflict: आता बास…आता संपवणार…इस्त्रायलने दिला इशारा)
पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारताने अलीकडेच अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. सध्या देशात क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन केले जात आहे. याशिवाय भारताने देशभरात G-20सारख्या मोठ्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. हे देशाच्या वाढत्या पायाभूत सुविधा आणि होस्टिंग क्षमतांचे सामर्थ्य प्रतिबिंबीत करते.
यावेळी पंतप्रधानांनी क्रिकेट विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याच्या शिफारशीचा उल्लेख करून यासंदर्भात लवकरच सकारात्मक बातमी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
खेळांचे महत्त्त्व सांगताना ते म्हणाले की, ६४ कलांपैकी एक म्हणजे खेळ. धोलाविरा आणि राखीगढी या 5 हजार वर्षे जुन्या जागतिक वारसा स्थळांवरही क्रीडा स्पर्धांशी संबंधित पायाभूत सुविधांची माहिती उपलब्ध आहे. खेळ आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेले असून त्यांचा आपल्या धर्मग्रंथातही उल्लेख आहे. खेळ जागतिक स्तरावर शांतता वाढवण्याचे माध्यम बनते.
आयओसीच्या अधिवेशनात ऑलिम्पिक स्पर्धेच्या भवितव्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. भारत दुसऱ्यांदा आणि जवळपास ४० वर्षांच्या कालावधीनंतर IOC सत्राचे आयोजन करत आहे. आयओसीचे 86वे अधिवेशन शेवटचे १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे झाले होते. भारतात होणारे IOCचे 141 वे सत्र जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी, खेळातील उत्कृष्टता साजरी करण्यासाठी आणि मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेच्या ऑलिम्पिक आदर्शांना पुढे नेण्यासाठी देशाच्या समर्पणाचे प्रतीक आहे. हे सत्र खेळांशी संबंधित विविध भागधारकांमध्ये परस्परसंवाद आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची संधी प्रदान करेल. या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOCचे इतर सदस्य तसेच भारतीय क्रीडा जगतातील प्रमुख व्यक्ती आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह विविध क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले की, भारत हे आमचे आयओसी सत्र आयोजित करण्यासाठी खरोखरच प्रेरणादायी ठिकाण आहे. भारताचा इतिहास गौरवशाली आहे. पंतप्रधान मोदींची आज या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती म्हणजे देशातील ऑलिम्पिक खेळांच्या वाढत्या सहभागाची साक्ष आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community