Kabaddi Game : कठोर मेहनतीचे चीज झाले !

आशियाई स्पर्धेत कबड्डीचा समावेश १९९० साली बीजिंग येथे झाला.

218
Kabaddi Game : कठोर मेहनतीचे चीज झाले !
Kabaddi Game : कठोर मेहनतीचे चीज झाले !
  • शशिकांत राऊत 

नुकतीच १९ व्या एशियन गेमची (Asian Championship) सांगता झाली. भारताने १०७ पदके मिळवून यंदा विक्रमी कामगिरी केली. याचा एक भारतीय म्हणून आम्हाला अभिमान वाटतो. हे एवढ्या सहज शक्य झालेले नाही. यामागे कठोर मेहनत आणि मिळालेल्या सुविधांचा केलेला योग्य वापर हेच कारण आहे. त्याच बरोबर काही खेळाडूंनी स्वखर्चाने वैयक्तिक पातळीवर घेतलेली मेहनत देखील पदकांच्या संख्येत वाढ होण्यास कारणीभूत ठरली. एक वेळ अशी आली होती की, भारताला अवघे एक सुवर्णपदक मिळाले होते, ते देखील फक्त कबड्डीत. आज भारत देखील क्रीडाक्षेत्रात प्रगती करत आहे. काही ठिकाणी तुटपुंज्या सुविधा असूनदेखील आपल्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

भारतीय कबड्डी (Kabaddi Game) संघाने यंदा गतस्पर्धेत हुकलेले पदक पुन्हा मिळविले. आशियाई स्पर्धेत कबड्डीचा समावेश १९९० साली बीजिंग येथे झाला. तेव्हापासून भारताचे कबड्डीत वर्चस्व होते. गत आशियाई स्पर्धेत मात्र भारताला इराणने रोखले. भारताच्या महिलांना रौप्य, तर पुरुषांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण यंदा भारताने मुसंडी मारत पुन्हा एकदा दोन्ही गटात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. यंदा महिला गटात चायनीज तैपईने भारतीय संघाला कडवी लढत दिली. साखळी लढतीत तर त्यांनी भारतीय महिलांना बरोबरीत रोखले. पण अंतिम सामन्यात अनुभवाच्या जोरावर भारतीय महिलांनी बाजी मारली. पुरुषांना इराणचा मोठा अडथळा होता. येथेही कल्पकता आणि अनुभव भारताच्या कामी आले.
पण आज जरी आपण सुवर्णपदक मिळविले तरी पुढील प्रवास मात्र खडतर आहे. इतर देशदेखील आज कबड्डीत प्रगती करू लागले आहेत. खरे पाहिले तर महाराष्ट्र हीच कबड्डीची जननी आहे. महाराष्ट्रानेच कबड्डीचा प्रचार व प्रसार देश-विदेशात केला. आशिया खंडात कबड्डीने जोर धरावा म्हणून महाराष्ट्रानेच बांगलादेश, भूतान, जपान, मलेशिया येथे प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन केले. काही नियम शिथिल केले. त्यामुळे आज आपणास आशिया खंडात कबड्डीचे रोपटे जगल्याचे दिसते. हळूहळू त्यांची प्रगती होत आहे. काही देश आपला संघ कबड्डीत प्रगती करावा म्हणून भारतीय प्रशिक्षक नेमत आहेत. काही देश सराव सामने खेळण्यास महाराष्ट्रात येत आहेत. त्याचा फायदा त्यांना होत आहे. पुरुषांमध्ये इराण, कोरियाने भारतासमोर आव्हान उभे केले असून महिलांमध्ये इराण, चायनीज तैपाई, थायलंड हे देश भारता समोर उभे ठाकले आहेत. भारताने यापुढे खेळाडूंची योग्य निवड व सरावात सातत्य राखले नाही तर आव्हान कठीण जाणार आहे.
आशियाई स्पर्धेत कबड्डीचा समावेश व्हावा म्हणून महाराष्ट्रानेच पुढाकार घेतला. शरदचंद्र पवार व कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांना त्याचे श्रेय जाते. तसे पाहिले तर १९९० साली दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत कबड्डीचा समावेश होणार होता. पण नेमक्या क्षणी शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोद सरकार स्थापन केल्याने या गोष्टीला खीळ बसली. बुवा साळवी यामुळे खूप नाराज झाले. शरद पवार संघटनेचे अध्यक्ष असल्याने त्यांनी त्यांच्या मागे लागून इंदिरा गांधी यांची भेट घेतली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पण इंदिरा गांधींनी बुवांना शब्द दिला की, कबड्डीचा आशियाई स्पर्धेत समावेश व्हावा म्हणून मी प्रयत्न करेन. शेवटी बीजिंग आशियाई स्पर्धेत हा ‘सोनियाचा दिन’ उगविला. बुवांनी अथक प्रयत्न करून देखील त्यांनी कबड्डीचा उद्घाटनीय सामन्याचा आनंद दादरच्या कार्यालयात बसून साजरा केला. पण पवारांनी त्यांना अंतिम सामन्याकरिता बीजिंगला पाठवून त्यांचा योग्य तो सन्मान केला.

पूर्वी कबड्डी ही मनोरंजन म्हणून खेळली जात असे. रामागड्यांचा खेळ म्हणून यास हिणवले जात असे. पण हा खेळ खेळल्याने नोकरी मिळते म्हणूनदेखील काही खेळाडू या खेळाकडे वळले. पण प्रो-कबड्डीने या खेळाला खऱ्या अर्थाने व्यावसायिक बनविले. यावर्षी प्रो-कबड्डीचे हे दहावे पर्व. पूर्वी हातात चड्डी-बनियन घेऊन स्पर्धेकरिता जाणारा खेळाडू आज चार चाकी घेऊन फिरू लागला. पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव करू लागला. प्रो-कबड्डीने खेळाडूंना करोडपती बनविले. पण आज जेव्हा आम्ही कबड्डी पाहतो, तेव्हा जुन्या खेळातील कौशल्य (स्किल) क्वचितच पाहायला मिळते. प्रो-कबड्डी ही व्यावसायिक कबड्डी आहे. त्यामुळे खेळाडू आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले; पण खेळातील कौशल्य मात्र हरविले. कबड्डी हा सांघिक खेळ आहे याचा खेळाडूंना विसर पडत चालला आहे. आज खेळाडू वैयक्तिक खेळ खेळण्यावर भर देत असल्याने सांघिक भावना लोप होत चालली आहे. आज ना उद्या याचे महत्त्व खेळाडूंना कळेल आणि खेळाडू पुन्हा संघ भावनेने खेळतील ही आशा करूया. तूर्तास, येथेच थांबतो!

( लेखक कबड्डी संघटक आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी पंच सचिव आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.