कम्पाऊंड तिरंदाजीचा समावेश ऑलिम्पिकमध्ये नाही. त्यामुळे एशियन गेम्स ही आमच्यासाठी एकमेव संधी आहे जिथे मल्टी स्पोर्ट्स प्रकारात आम्हाला खेळता येतं. त्यामुळे या गेम्सच्या प्रत्येक सेकंदाचा मी आनंद लुटला. सगळे अनुभव मनात साठवायचे असं ठरवून मी खेळले. सेमी फायनलमध्ये ज्योतीने मला हरवलं तरी मला फारसं वाईट वाटलं नाही. मी तिरंदाजीत तिलाच आदर्श मानत आले आहे. त्यामुळे तिच्यासोबत हरल्याचं जराही दु:ख नाही. शेवटी सुवर्ण भारतालाच मिळालं, त्याचाच आनंद जास्त आहे. याच वर्षी माझी सीनिअर गटात निवड झाली याचंच मला आश्चर्य वाटलं. त्यामुळे माझ्या आदर्श खेळाडूंबरोबर मला जवळून सराव करता आला. त्यांच्या बरोबर खेळणं, राहणं, जेवणं यातूनच मी खूप काही शिकत आहे. मला हा अनुभव पुरेसा आहे. एशियन गेम्समध्ये मिळालेली संधी यामुळेच मी खूप खूश आहे. तर खेळ, सराव आणि स्पर्धा मी एंजॉय करते. (Archery)
(हेही वाचा :Viral Video : पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंच्या पाहुणचारावर देशभक्त तरुणाने व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केला संताप)
सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातली मी मुलगी आहे. साताऱ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर मूळ गाव आहे. पण, माझ्या वडिलांनाही खेळाची आवड आहे त्यामुळे मला त्यांनी आठव्या वर्षीच साताऱ्यात आणले. वडील गोपीचंद स्वामी सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. तर आईही सरकारी कर्मचारी आहे. माझ्या घरची परिस्थिती काही खूप श्रीमंतीची नाही. माझं सुरुवातीचं ट्रेनिंग प्रवीण सरांच्या (कोच) धनुष्य-बाणावर झालं. पुढे वडिलांनी कर्ज काढून मला धनुष्य बाण आणि इतर साहित्य घेतलं. तेव्हा मी स्पर्धा खेळू शकले. मग काही स्पर्धांमध्ये पदकं जिंकल्यावर सरकारच्या खेलो इंडिया स्कीममधून मदत मिळाली. आता चांगलं चाललंय. ज्युनिअरमधून सीनिअर गटात मी दोन वर्षांत पोहोचले. तेव्हापासून सीनिअर गटातील खेळाडूंकडून खूप काही शिकायला मिळत आहे. त्यांच्याशी फक्त बोलण्याने खूप फरक पडतो. आणि सीनिअर खेळाडूही माझ्याशी खूप छान वागतात. हातचं राखून न ठेवता मला लागेल तशी मदत करतात. संघात खूप चांगलं वातावरण आहे. कम्पाऊंड प्रकार ऑलिम्पिकमध्ये नाही. कदाचित २०२८ मध्ये येऊ शकेल. पण म्हणून मी माझा प्रकार बदलणार नाही. इथंच खेळत राहणार. एकतर आतापर्यंत मी तोच खेळ शिकले आहे. आता तो बदलण्याच्या मी खूप पुढे गेले आहे. मला कम्पाऊंड प्रकाराने इतकं काही दिलंय. मला त्यातच आनंद मिळतो. आता बदलायचं नाही. प्रवीण सरांनी माझ्यावर आणि ओजसवर खूप मेहनत घेतलीय. त्यांचं मार्गदर्शन खूप मोलांचं आहे. या सगळ्यातून पुढे आणखी चांगलं करण्याची प्रेरणा मला मिळणार आहे. सराव करत राहायचा आणि स्पर्धा खेळत राहायच्या एवढं नक्की. मी दिवसाचा तीन तास सराव कधीही चुकवत नाही. भारतात परत आल्यापासून दोन दिवस फक्त सत्कार समारंभ सुरू आहेत. सगळे कौतुक करतायत याचं खूप छान वाटतंय. घरच्यांशी बोलायलाही वेळ मिळालेला नाही. पण बाबांनी एकच गोष्ट आल्यावर सांगितली, रोजचा सराव सोडू नको. त्यामुळे मी सकाळी सराव करते आणि मगच कार्यक्रम अटेंड करते. नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते मोठा कार्यक्रम झाला, ते खूप भारी वाटलं. त्यांनी मी कुठल्या गावची, ते कुठे आहे असे प्रश्नही विचारले. तो अनुभवही छान होता. मी स्पर्धेचं दडपण कधीच घेत नाही. आपल्या खेळावरच फोकस करते. त्यामुळेच कदाचित मी चांगली खेळू शकले आणि इथपर्यंत पोहोचले. आम्हाला परदेशी कोच उपलब्ध करून दिल्यामुळे खेळात खूप फरक पडला. माझ्या खेळातल्या तांत्रिक चुका मी दोन वर्षांत दूर केल्या. संघ म्हणून आम्ही एकत्र खेळायला शिकलो. खेळात एक शिस्त आली. त्याचा परिणाम खेळावर झाला आहे.
(लेखिका आशियाई क्रीडा स्पर्धेतील कम्पाऊंड तिरंदाजीमधील कांस्य पदक विजेत्या आहेत.)