ऋजुता लुकतुके
देशाचा पहिला ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्ण विजेता खेळाडू अभिनव बिंद्राला (Abhinav Bindra on Olympics) देशात ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली पाहायचीय. ‘देशात नजीकच्या काळात ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित व्हावी अशी मी आशा करतो,’ असं तो मुंबईत बोलताना म्हणाला.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेच्या १४१ व्या वार्षिक कार्यकारिणी बैठकीसाठी अभिनव सध्या मुंबईत आला आहे. आणि तेव्हा त्याने काही मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. २००८ च्या बाजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनवने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकलं होतं. निवृत्तीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुधारणा करण्यासाठी अभिनव भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनबरोबर काम करत आहे.
ऑलिम्पिक आयोजनाविषयी बोलताना बिंद्रा म्हणतो, ‘देशातील क्रीडा विषयक वातावरणासाठी ऑलिम्पिक आयोजन ही मोठी संजीवनी असेल. आणि मलाही आशा आहे की, नजीकच्या काळात अशी संधी भारताला मिळेल. ती मिळाली तर खूपच छान होईल.’
(हेही वाचा-Congress vs SP : कॉंग्रेसच्या विरोधात सपाने दंड थोपटले; मध्यप्रदेशात दोन्ही पक्ष आमने-सामने)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक परिषदेच्या कार्यकारिणी उद्घाटनाच्या वेळी परिषदेचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्याबरोबर रविवारी संवाद साधला होता. आणि त्यानंतर भारताची ऑलिम्पिक आयोजनाची इच्छाही त्यांनी उघडपणे बोलून दाखवली. २०३६ चं ऑलिम्पिक तसंच २०२९ चं युवा ऑलिम्पिक यांच्या आयोजनासाठी भारत देश उत्सुक असल्याचं मोदी म्हणाले. तसंच या आयोजकत्व मिळवण्यासाठी केंद्रसरकार कसलीही कसूर सोडणार नाही, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं होतं.
आता अभिनवनेही पंतप्रधानांच्या तयारीला दुजोरा दिला आहे. ऑलिम्पिक (Abhinav Bindra on Olympics) परिषदेच्या कार्यकारिणीत अभिनव बिंद्राने ओडिशात सुरू केलेल्या ‘ऑलिम्पिक व्हॅल्यू ॲडिशन प्रोग्राम’ या कार्यक्रमाविषयी माहिती उपस्थितांना दिला. या कार्यक्रमामुळे एकट्या ओडिशा राज्यांत १५,०००च्या वर मुलं पहिल्यांदा एखाद्या खेळाकडे वळल्याची माहिती अभिनवने दिली.
हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनंच देशादेशांत सुरू केला आहे. आणि भारतात त्याची अंमलबजावणी अभिनव बिंद्रा फाऊंडेशनच्या मार्फत होते. अशा कार्यक्रमांच्या यशस्वितेचा चांगला परिणाम देशाच्या ऑलिम्पिक आयोजनावरही होणार आहे. कारण, आयोजकत्व बहाल करताना ऑलिम्पिक परिषद देशातील क्रीडाविषयक वातावरण आणि विविध स्तरावर पदक विजेते खेळाडू यांची संख्या यांचाही अभ्यास करत असते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community