बोरिवली येथील भाजपचे आमदार (BJP MLA) सुनील राणे यांच्या गरब्याचे बनावट पास बनवून त्यांची विक्री करणाऱ्या चौकडीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी मुख्य आरोपी हा ग्राफिक डिझायनर असून फसवणुकीवर आधारित वेबसिरीज बघून त्याला ही कल्पना सुचली होती. पोलिसांनी त्याच्याकडून ३०लाख रुपये किमतीचे बनावट पासेस आणि ६ लाख रुपयांचे साहित्य असा एकूण ३६ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
करण अजय शाह (२९) , दर्शन प्रवीण गोहिल (२४) परेश सुरेश नेवरेकर (३५)कविष भालचंद्र पाटील (२४) असे अटक करण्यात आलेल्या चौकडीची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे विरार, कांदिवली आणि मालाड मनोरी या परिसरात राहणारे आहेत.
भाजपचे आमदार सुनील राणे यांनी बोरिवली येथे रंगरात्री दांडिया नाईट्स सीझन२ चे आयोजन केले आहे. या दांडिया नाईट्सचे काही जणांनी बनावट पास तयार करून त्यांची विक्री करीत असल्याची तक्रार एमएचबी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू करून १२ तासात चार जणांना अटक केली. या चौकडीकडून सुमारे ३६लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, त्यात बनावट पासेस तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि ३० लाख किमतीचे एक हजार बनावट पासेस चा समावेश आहे.
विरार येथे राहणारा करण शाह हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून तो ग्राफिक डिझायनर आहे, ‘फर्जी’ नावाच्या वेबसिरीज बघून त्याला बनावट पास तयार करून त्याची विक्री करण्याची कल्पना सुचली आणि त्याने इतरांना हाताशी घेऊन बोरिवली कांदिवलीतील सर्वात गर्दीचे ठिकाण असलेल्या गरब्याचे ठिकाण शोधून अखेरीस भाजपचे आमदार सुनील राणे यांनी बोरिवली येथे रंगरात्री दांडिया नाईट्स सीझन२ यांच्या दांडिया नाईट्स सिझन २ चे बनावट पास बनवून त्यांची विक्री सुरू केली होती अशी माहिती तपासात समोर आली. या टोळीने आतापर्यंत किती जणांना हे बनावट पासेस विकले या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.