ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान दिल्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. सुरुवातीला ओवल क्रॉस मैदानाची चाचपणी करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आझाद मैदान अंतिम करण्यात आल्याचे कळते. (Dasara Melava)
शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादर येथील शिवाजी पार्कवर घेण्यात येतो. मात्र, दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून दोन वेगवेगळे मेळावे घेतले जात आहेत. गेल्यावर्षी दसऱ्यावेळी शिवसेना कुणाची, याचा निर्णय झाला नसल्याने ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान देण्यात आले होते. यंदा मात्र एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना या मैदानासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. परंतु, मैदान हिसकावले, असा आरोप करीत ठाकरे गटाकडून सहानुभूतीचे कार्ड खेळले जाईल आणि त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसेल, ही शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.
(हेही वाचा : MHADA Konkan Mandal Lottery : ऑनलाइन अर्ज करण्याकरिता १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ)
त्यानंतर ठाकरे गटाच्या तिप्पट गर्दी जमवण्याच्या दृष्टीने दक्षिण मुंबईतील सर्वात मोठ्या ओवल क्रॉस मैदानाची चाचपणी करण्यात आली. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे या मैदानाचा प्रस्ताव मागे पडला आहे. या मैदानावर क्रिकेटपटू सराव करतात. त्यांच्यासाठी जागोजागी खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे सभामंडप उभारताना धावपट्ट्यांना हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय शेजारी उच्च न्यायालय असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मैदानाच्या दोन्ही बाजूंना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देता येणार नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेऊन आझाद मैदानाचा प्रस्ताव अंतिम करण्यात आल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community