आम्ही पोलीस प्रशासक बदल्या आणि पोस्टींगसाठी राजकीय नेत्यांवर अवलंबून राहिलो आहोत. हे समाजासाठी चांगले नाही, असे म्हणत माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी पुणे हिंसाचारावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करून नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख करत अजून एक गौप्यस्फोट केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते पॉवरफुल झाले आहेत असे म्हणत त्या म्हणाल्या की, ज्यावेळी नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा होता त्यावेळी आमच्याकडे तांत्रिक पुरावा होता. पुणे बंदमध्ये हिंसाचार कसा करावा याबाबत चांगला पुरवा होता. माझे अधिकारीच मला तेव्हा म्हणाले, मॅडम गुन्हा दाखल करू नका. आम्हाला तुम्हाला मुंबई पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner)झालेले पाहायचे आहे. त्यामुळे त्यावेळी मी खूप दबावाखाली होते. आपण जर असं केलं तर आपल्याला पोलीस आयुक्त पद देण्यात येणार नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
मी जे घडलंय ते पुस्तकात लिहिलंय. व्हिलन तेव्हा होतो जेव्हा शासकीय जमीन आपण देऊन टाकली असती. पुणे पोलिसांना (Pune Police) हा प्रस्ताव मान्य नाही असं आपण जेव्हा शासनाच्या निदर्शनाला आणले. आम्ही जागा देणार नाही असे सांगितल्यानंतर शासनाने आदेश मागे घेतला. माझ्या विरोधाची मला किंमत चुकवावी लागली, पण वाईट वाटलं नाही कारण मी घेतलेला निर्णय योग्य होता. मला निवृत्त होऊन सहा वर्षे झाली, कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, असं मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी सांगितले.
(हेही वाचा – ISRO : भारत २०४० पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निश्चय)
पुस्तकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, वर्षभरापूर्वीच मी पुस्तक लिहिलंय. प्रकाशन उशिरा झालं. कुठल्याही राजकीय पक्षाला एकदम रोखठोक अधिकारी आवडत नाही. आपण कुठल्याही राजकीय पक्षाला जबाबदार धरू शकत नाही. जे अधिकारी त्यांचे सांगणे ऐकतात तेच नेत्यांना आवडतात, असंही त्यांचं म्हणणं आहे.