मुंबईत मागील दोन दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध नसल्याने, अनेक लसीकरण केंद्रं बंद करण्यात आली होती. पण मुंबई महापालिकेला लस उपलब्ध झाल्यामुळे सोमवारपासून सर्व रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांमध्ये पुन्हा लस देण्यास सुरुवात होणार आहे.
पुन्हा सुरू होणार केंद्रं
मुंबई महापालिका आणि शासनाच्यावतीने ४९ लसीकरण केंद्रं तर, खाजगी रुग्णालयांच्यावतीने ७१ केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये दिवसाला सरासरी ४० ते ५० हजार लसीकरण केले जाते. मात्र, लसींचा साठा नसल्याने खाजगी लसीकरण केंद्रांतील लसीकरण थांवण्यात आले होते. मागील दोन दिवसांमध्ये महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रंच सुरु होती. पण आता लसींचा साठा उपलब्ध झाल्यामुळे, बंद करण्यात आलेली केंद्रं सोमवारपासून पुन्हा सुरू होतील, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः लसीकरणात महाराष्ट्र झाला ‘कोट्याधीश’! कशी आहे लसीकरणाची आकडेवारी?)
खाजगी रुग्णालयांतील लसीकरणाचे काय?
खाजगी रुग्णालयांमधील केंद्रांमध्ये जेवढ्या नागरिकांची लसीकरणासाठी नोंद झाली आहे. त्या नागरिकांची माहिती व त्याबाबतची प्रक्रिया संबंधित रुग्णालयांनी पूर्ण केल्यानंतर, त्यांना त्याप्रमाणे लसींचा साठा उपलब्ध करुन दिला जाईल. त्यामुळे महापालिकेकडे लसींचा साठा असून उपलब्ध साठ्यातून त्यांना लस दिल्या जातील. पण केंद्रांकडून या प्रक्रिया पूर्ण न झाल्यास त्यांना लसींचा पुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे जर का खाजगी केंद्रं बंद राहिल्यास हा त्यांचा प्रश्न असेल. पण लसींचा साठा नाही म्हणून ते केंद्र बंद आहे असा कोणी समज करुन घेऊ नये, असेही गोमारे यांनी स्पष्ट केले.
७१ पैकी ६२ खाजगी केंद्रे सुरू होणार
९ एप्रिल रोजी रात्री उशिरा ९९ हजार लसी आणि १० एप्रिल रोजी १ लाख ३४ हजार ९७० अशा एकूण २ लाख ३३ हजार ९७० लसींच्या मात्रा मागील दोन दिवसांत बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खाजगी रुग्णालयांत लसीकरण केंद्रांसाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे सोमवारी १२ एप्रिल रोजी नियमित वेळेत ७१ पैकी ६२ खाजगी लसीकरण केंद्रं देखील कार्यान्वित राहतील.
दिवसभरात ३३ हजार २५६ लसीकरण
मुंबईत महापालिका व शासकीय केंद्रांमध्ये सुरू असलेल्या केंद्रांमध्ये दिवसभरात ३३ हजार २५६ जणांचे लसीकरण पार पडले. यामध्ये ३० हजार ६७ जणांनी पहिला डोस तर, ३ हजार १८९ जणांनी दुसरा डोस घेतला. खाजगी रुग्णालयांमध्ये केवळ २४० जणांचे लसीकरण झाले. महापालिकेच्या केंद्रांमध्येच दिवसभरात २९ हजार ५४ जणांचे लसीकरण पार पडले. तर शासकीय केंद्रांमध्ये ३ हजार ९६२ जणांचे लसीकरण पार पडले.
Join Our WhatsApp Community