ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध पाकिस्तानचा (Ind vs Pak) विश्वचषकातील सामना भारताने ७ गडी राखून आरामात जिंकला. तो पाहायला पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ स्वत: भारतात आले होते. पाक खेळाडू आणि अधिकारी यांची चांगली सरबराई भारतात झाली असं खेळाडूही आतापर्यंत सांगत होते.
पण, अश्रश झका मात्र काही गोष्टींवरून नाराज आहेत, असं समजतंय. आणि त्यांनी आयसीसीकडे काही गोष्टींची रितसर तक्रारही केली आहे. पाक बोर्डाने अधिकृत ट्विटर हँडलवर तसं म्हटलंय. खेळाडू तसंच पत्रकारांना वेळेवर व्हिसा न दिल्याची वेगळी तक्रार त्यांनी केली आहे. त्यातच आता ही नवी तक्रार दाखल झाली आहे.
The Pakistan Cricket Board (PCB) has lodged another formal protest with the ICC over delays in visas for Pakistani journalists and the absence of a visa policy for Pakistan fans for the ongoing World Cup 2023.
The PCB has also filed a complaint regarding inappropriate conduct…
— PCB Media (@TheRealPCBMedia) October 17, 2023
‘१४ ऑक्टोबरला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या दरम्यान पाक खेळाडूंना लक्ष्य करून त्यांना चांगली वागणूक देण्यात आली नाही. आणि याविषयी आयसीसीकडे आम्ही अधिकृत तक्रार दाखल केली आहे,’ असं या ट्विटमध्ये म्हटलंय.
पण, यात पाक बोर्डाला नेमकं काय खटकलंय हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. अध्यक्ष झका अश्रफ भारतातच नाराज होते. आणि पाकला परत गेल्यावर ते असं काहीतरी पाऊल उचलणार अशी शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे हे ट्विट प्रसिद्ध झालं आहे.
(हेही वाचा-FDA Notice Hotels : मुंबईतील १३७ हॉटेल रेस्टॉरंट्सना एफडीएच्या नोटिसा, १५ दिवसांचा इशारा)
पाक संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी सामना संपल्यानंतर काही प्रेक्षकांनी पाक खेळाडूंविरुद्ध नारेबाजी केल्याचा आरोप केला होता. आणि अशी हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांना आवरलं गेलं नाही, असंही त्यांचं म्हणणं होतं. पाकच्या पराभवासाठी त्यांनी या गोष्टीला जबाबदार धरलं होतं.
पण, झका अश्रफ यांच्या मनात नेमकी कुठली गोष्ट आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. अश्रफ पाकिस्तानला परत गेल्यानंतर ते अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेत आहेत. आणि त्यात भारतातील त्यांचं वास्तव्य आणि बीसीसीआयकडून तसंच भारतीय प्रशासनाकडून त्यांना मिळालेली वागणूक या गोष्टी केंद्रस्थानी आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेनं याविषयी माहिती दिली आहे.
पाक संघ भारतात येण्यापूर्वी खेळाडूंना व्हिसा देण्यावरूनही अश्रफ नाराज होते. संघाला व्हिसा मिळवण्यात अडचणी आल्यामुळे संघाला पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करावा लागला होता. त्यानंतर पाक पत्रकारांना व्हिसा मिळवण्यातही अडचणी आल्या. या गोष्टींची अधिकृत तक्रारही पाक बोर्डाने आयसीसीकडे केली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community