Narayan Savarkar : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर

लहान वयातच अंगावर आलेली संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलताना, आपले हिंदुराष्ट्र पुन्हा एकदा बलशाली समर्थ राष्ट्र व्हावे यासाठी नारायण दामोदर सावरकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

937
Narayan Savarkar : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर
Narayan Savarkar : वीराग्रणी डॉ. नारायण दामोदर सावरकर

मंजिरी मराठे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू ही झाली त्यांची एक ओळख. (Narayan Savarkar) पण त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं स्वतःची ओळख निर्माण केली ती वीराग्रणी डॉ. नारायण सावरकर म्हणून ! २५ मे १८८८ हा त्यांचा जन्मदिवस. आपले दोन बंधू गणेश दामोदर (बाबा) आणि विनायक दामोदर (तात्या) अंदमानात काळ्या पाण्याची, जन्मठेपेची शिक्षा भोगीत असताना इकडे नारायणराव स्वस्थ नव्हते. आपल्या बंधूंची केवळ भेट मिळावी, यासाठीसुद्धा त्यांना टाचा झिजवाव्या लागल्या. त्या दोघांच्या सुटकेसाठी त्यांनी आंदोलनच उभारले. सुटकेसाठी अतोनात प्रयत्न केले. बॉम्बे नॅशनल युनियन या संस्थेचे कार्यकर्ते, पुण्यातले अनंत हरी गद्रे, सेनापती बापट यांच्या सहकार्याने त्यांनी चार महिन्यात ऐंशी हजार स्वाक्षऱ्या गोळा केल्या. त्या स्वाक्षऱ्यांसोबत एक निवेदन ब्रिटिश सरकारला पाठविले. पण सरकार बधले नाही, तरी पदरमोड करून, कर्ज काढून नारायणराव प्रयत्न करीत राहिले. अखेर 1921 मध्ये दोन्ही बंधूंची सुटका झाली. (Narayan Savarkar)

(हेही वाचा – Coal Ministry : कोळसा मंत्रालयाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केली ‘इतक्या’ दशलक्ष टन कोळशाची विक्रमी वाहतूक)

अभिनव भारत या वीर सावरकरांनी सुरु केलेल्या क्रान्तिकारी संघटनेचे ते कृतिशील सदस्य होते. दोघे बंधू अंदमानात असताना त्यांनी क्रान्तिकार्यात खंड पडू दिला नाही. अभिनव भारतच्या शाखा विस्तारतच राहिल्या. कुठलीही हत्या, बॉम्ब फेकीनंतर नारायणरावांची अटक, झडती, जप्ती ठरलेली असे. १३ नोव्हेंबर १९०९ ला कर्णावती (अहमदाबाद) येथे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकण्यात आला. संशयावरून नारायणरावांना अटक करण्यात आली. १८ डिसेंबर १९०९ ला त्यांची सुटका झाली. पण २१ डिसेंबर १९०९ ला अनंत कान्हेरे यांनी नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सनचा वध केला आणि २३ डिसेंबरला नारायणरावांना पुन्हा अटक झाली. या कटातील मुख्य आरोपी होते विनायक दामोदर सावरकर. अडतीस आरोपींपैकी सर्वात लहान आरोपी होते नारायणराव. या अभियोगात वीर सावरकरांना झाली ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा, तर नारायणरावांना सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा. २२ जून १९११ ला शिक्षा भोगून परत आल्यावर त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. इतर कुठल्याच महाविद्यालयांनी प्रवेश दिला नाही; पण कलकत्त्यातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि ते दंत विशारद झाले. अभ्यास सुरु असतानाही १९१२ मध्ये दिल्लीत, लॉर्ड हार्डिंग्जवरील बॉम्बफेक प्रकरणात नारायणरावांना पकडण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ झाला आणि नंतर पुराव्याअभावी त्यांची मुक्तताही झाली. (Narayan Savarkar)

दोन्ही बंधू अंदमानात असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी नारायणरावांवर होती. गरजेपुरता वैद्यकीय व्यवसाय करून त्यांनी आपले राजकीय, सामाजिक आणि क्रान्तिकार्य सुरूच ठेवले. सरकारी ससेमिरा होताच त्यात समाजही चार हात दूरच राहू पहात होता अशावेळी त्यांच्या मदतीला धावून आल्या त्या मादाम भिकाजी रुस्तम कामा. १९१७ मध्ये मुंबईत स्थायिक झाल्यावर ते लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सामील झाले. टिळकांच्या मृत्यूनंतर गांधींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह चळवळीतही त्यांनी उडी घेतली. पण पुढे काँगेसच्या स्वराज्य धोरणाला वेगळेच वळण लागलेले पाहून आणि काँग्रेसमध्ये राहून सशस्त्र क्रांती घडवून आणणे कठीण आहे हे जाणवल्यावर ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि हिंदु महासभेच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालाही हातभार लावला. संघाच्या बैठका डॉ. सावरकरांच्या औषधालयातच होत असत.

गांधींनी अफगाणिस्थानच्या अमानुल्लाखानला हिंदुस्थानवर स्वारी करण्यासाठी पाचारण केलेले पाहून सावरकर बंधू अवस्थ झाले होतेच. पण या कटाचे कारस्थान सर्वप्रथम उघड केले ते आर्य समाज नेते स्वामी श्रद्धानंद यांनी पण त्यांचा खून झाला. त्यांच्या या बलिदानाचे स्मारक म्हणून डॉ. सावरकरांनी इतर सामजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने श्री स्वामी श्रद्धानंद महिलाश्रमाची स्थापना केली. तसेच श्रद्धानंद वृत्तपत्र सुरू केले. साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत श्रद्धानंद मधून सावरकर बंधू परखड मतप्रदर्शन करीत राहिले. ते इतके गाजले की त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. त्यासाठी बाबाराव आणि नारायणरावांनी अथक परिश्रम घेतले. हे पत्र चालविण्यासाठी नारायणरावांना आपले घरही विकावे लागले. परंतु अखेरीस सरकारने त्यावर बंदी आणली. वृत्तपत्र इतिहासातील श्रद्धानंदचे योगदान अनन्यसाधारण आहे.

पंजाब आणि बंगालमधील गुप्त संघटनांबरोबर त्यांचा नियमित संपर्क होता. त्यांचे औषधालय म्हणजे दुर्गाभाभी व्होरा, पृथ्वीसिंह आझाद आणि असंख्य क्रान्तिकारकांचे मुंबईतील आश्रयस्थानच होते. ते उत्कृष्ट वक्तेही होते. त्यांनी बाबाराव सावरकर आणि येसुवहिनींची शेवटपर्यंत सेवा शुश्रूषा केली. त्यांच्या या सर्व कार्यात त्यांच्याबरोबर ठाम उभ्या राहिल्या त्या त्यांच्या पत्नी शांताबाई. अत्यंत प्रसन्नवदन, हसतमुख असल्यामुळे अच्युतराव कोल्हटकर नारायणरावांना ‘हसरं कमळ’ म्हणत असत. शीतल चांदण्यासारखा त्यांचा स्वभाव होता. लहान वयातच अंगावर आलेली संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलताना, आपले हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा बलशाली समर्थ राष्ट्र व्हावे यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. पण त्यांचा अंत मात्र अत्यंत दुर्दैवी झाला. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीत त्यांच्या घरावर हल्ला झाला. मुलांना, घराला वाचविण्यासाठी, आजारी असूनही मागच्या दाराने ते घराबाहेर पडले. त्यांच्यावर दगडफेक झाली, मोठा दगड त्यांच्या डोक्यात घालण्यात आला. अहिंसेच्या पुजाऱ्याच्या चेल्यांनीच हे कृत्य केलं. त्यातून डॉ काही सावरले नाहीत आणि १९ ऑक्टोबर १९४९ रोजी या थोर देशभक्ताचा अंत झाला. त्यांना विनम्र अभिवादन !! (Narayan Savarkar)

(लेखिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.