गेल्या वर्षभरापासून थैमान घालत असलेल्या कोरोनाचा प्रभाव आजही कायम आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सगळेच सण-उत्सव हे या रोगाच्या सावटाखाली गेले. मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही या सणावर कोरोनाचे सावट आहे. १३ एप्रिल रोजी हा सण संपूर्ण राज्यात साजरा होणार आहे. पण कोरोनाच्या दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन, राज्याच्या गृह विभागातर्फे करण्यात आले आहे. तसेच त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
अशा आहेत सूचना
- सकाळी ७ ते संध्याकाळी ८ पर्यंत हा सण साधेपणाने साजरा करता येईल
- गुढीपाडव्यानिमित्त पालखी, दिंडी, प्रभात फे-या, बाईक रॅली व मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर बंदी
- पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सर्व नियमांचे पालन करत घरगुती गुढी उभारावी
- आरोग्यविषयक उपक्रम किंवा रक्तदानासारखी शिबिरे प्रशासनाच्या पूर्व परवानगीने नियमांचे पालन करत आयोजित करावीत
- स्थानिक व पोलिस प्रशासन आणि शासनाच्या सर्व विभागांकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे
अशा सूचना राज्य शासनाच्या गृह विभागातर्फे जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community