नालासोपाऱ्यात कमालीचा हलगर्जीपणा! ऑक्सिजनअभावी ७ रुग्णांचा मृत्यू!

कोरोनाबाधित रुग्णांचे हे मृत्यू नव्हे हत्या आहे, असा आरोप भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला. 

145

सध्या राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यातच काही रुग्णालयात हलगर्जीपणामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. नालासोपाऱ्यातील विनायक रुग्णालयातही रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तब्बल ७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना जबाबदार धरले आहे.

काय झाले विनायक रुग्णालयात? 

नालासोपारा येथील विनायक रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात कोरोनाबाधित ज्या रुग्णांची ऑक्सिजनचा पातळी घसरलेली आहे, त्याही रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांना या रुग्णालयात ऑक्सिजन दिला जात आहे. या रुग्णालयातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये सोमवारी, १२ एप्रिल रोजी अचानक बिघाड झाला. परिणामी रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. त्यामुळे येथील ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, याचे तीव्र पडसाद नालासोपारा परिसरात उमटले आहे. घडल्या प्रकरणी राज्य सरकारवर दोषारोप करण्यात येऊ लागले आहेत.

(हेही वाचा : राज्यासाठी रेल्वेकडून २१ बोगींचे विलगीकरण कक्षात रुपांतर!)

ही हत्या आहे! – किरीट सोमय्या 

या घटनेला आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे कारणीभूत आहेत, असे भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या म्हणाले. ऑक्सिजनच्या अभावी विनायक रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होणे, ही त्यांची हत्या आहे, याला आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे कारणीभूत आहेत, त्यामुळे त्यांनी तात्काळ मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी डॉ. सोमय्या यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.