Youth Drugs Addiction : ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई

ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून २०२० मध्ये तो ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले होते.

188
Youth Drugs Addiction : ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई
Youth Drugs Addiction : ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई
  • प्रवीण दीक्षित

पुण्यातील ससून रुग्णालयातून जप्त करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या ड्रग्ज साठा प्रकरणात मुंबई पोलिसांनी प्रमुख आरोपी ललित पाटील याला नुकतीच अटक केली आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत अमली पदार्थांचा विळखा (Youth Drugs Addiction) राज्यातच नव्हे, तर संबंध देशभरात वाढत चालला आहे. खरे तर हे पाकिस्तानने भारताविरुद्ध छेडलेले छद्मयुद्ध किंवा प्रॉक्सी वॉर आहे. गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांची आणि तपास यंत्रणांची नाही; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे.

ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून २०२० मध्ये तो ड्रग्जच्या रॅकेटमध्ये असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अटक झाल्यापासून ललित प्रदीर्घ काळ ससून रुग्णालयात तळ ठोकून होता. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली होती आणि त्याचा उपयोग करून तो ससूनमधून निसटला होता. अटकेनंतर त्याच्या चौकशीतून ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक, अलीकडील काळात राज्यातच नव्हे, तर सबंध देशभरात अमली पदार्थांचा विळखा वाढत चालल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा – Operation Ajay : इस्रायल मधून सहावे विमान भारतात)

आतापर्यंत झालेल्या युद्धांमध्येही पाकिस्तानला भारताने धूळ चारली आहे. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्’ असे म्हणत भारताला रक्तबंबाळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानचीच कालौघात शकले झाली आणि बांगलादेश वेगळा झाला. तेव्हापासून पाकिस्तानने कधी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तर कधी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला; परंतु भारत सरकार, भारतीय सैन्य आणि भारतीय जनता या तिघांनी एकत्र येऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत केले. भारतातील जनतेला याची शिक्षा द्यायची म्हणून या देशातील तरुणांभोवती अमली पदार्थांचा विळखा घालण्याचे षड्यंत्र आयएसआयने रचले आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असण्याबरोबरच सर्वाधिक तरुणांचाही देश आहे. १५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण आपल्या लोकसंख्येमध्ये मोठे आहे. ही तरुणपिढी म्हणजे भारताची संपत्ती आहे.

लोकसंख्येच्या परिभाषेत त्यांना ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ असे म्हटले जाते. कार्यकुशल मनुष्यबळाची उपलब्धता हा आर्थिक व औद्योगिक विकासाचा कणा मानला जातो. तरुणपिढीचे हे योगदान आणि महत्त्व लक्षात घेऊन पाकिस्तानने भारतातील तरुणाईला व्यसनाधिन करून टाकण्याचा जणू चंगच बांधला आहे. यासाठी कधी हवाई मार्गाने, कधी जमिनी मार्गाने किंवा कधी समुद्रमार्गाने पाकिस्तान भारतात अफू, चरस, गांजा, हेरॉईन यांसारखे अमली पदार्थ पाठवत आहे. हे प्रमाण साधेसुधे नसून अक्षरशः काही टन अमली पदार्थ पाकिस्तानातून तस्करीच्या मार्गाने भारतात येत आहेत. यातील काही अमली पदार्थांची किंमत ही काही हजारांमध्ये असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास एक ग्रॅम हेरॉईनची किंमत अफगाणिस्तानातून विकले जाते तेव्हा समजा १०० रुपये असेल, तर मुंबईच्या बाजारात ते १० हजारांना विकले जाते. यातून एकीकडे भारतातील समाजव्यवस्थेत विष पेरायचे आणि दुसरीकडे प्रचंड नफा कमवायचा असा दुहेरी डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अन्य काही संस्थांच्या, तपास अधिकाऱ्यांच्या तपासातून ही बाब उघड झालेली आहे की, अमली पदार्थांच्या व्यापारातून-तस्करीतून मिळालेला पैसा शस्रास्रांचा पुरवठा करण्यासाठी आणि दहशतवादी तत्त्वांना आर्थिक रसद पुरवण्यासाठी वापरला जातो. अलीकडील काळात वेगवेगळ्या मोडस ऑपरेंडी पाकिस्तानकडून वापरल्या जात आहेत.

हवाई, समुद्री आणि जमिनी अशा तिन्ही मार्गाने पाकिस्तान तरुण पिढीला बरबाद करणारे हे विष भारतात पेरत आहे. मध्यंतरी असे आढळून आले होते की, काही पाकिस्तानी स्मग्लर श्रीलंकेच्या तुरुंगातून समुद्री मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीचे नियोजन करत होते. आपल्याकडे मुंबई विमानतळावर युगांडा, नायजेरिया आदी ठिकाणांहून येणाऱ्या अनेक स्मग्लरना मागील काळात रंगेहाथ पकडण्यात आपल्या तपास यंत्रणांना यश आले आहे. तथापि, यातील दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्याकडील तरुणपिढी यामध्ये प्रचंड प्रमाणात गुरफटत चालली आहे.

गेल्या वर्षभरात २५ हजार कोटींहून अधिक किंमतीचे ड्रग्ज तपास यंत्रणांनी, नार्कोटिक्स ब्युरोने आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी पकडलेले आहेत. अर्थात, ही सतत चालत राहणारी लढाई आहे. ही लढाई केवळ पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी लढायची नाहीये; त्यामध्ये जनतेनेही खूप मोठ्या प्रमाणावर जागरुक राहणे गरजेचे आहे. आज आपला मुलगा अमली पदार्थांचे सेवन करत आहे की नाही, हे पालकांना तोपर्यंत माहीत नसते जोपर्यंत तो पूर्णपणे व्यसनाधिन होत नाही. हे लक्षात घेता आपल्या पाल्यांबाबत अत्यंत जागरुक राहण्याची वेळ आजच्या काळात पालकांवर आली आहे. आजच्या पालकांची संगोपनाची व्याख्या पाहिल्यास बहुतांश आई-वडिलांचा कल मुलांना भरपूर पैसे आणि भौतिक सुविधा देण्याकडे असल्याचे दिसते. पण याखेरीज मुलांना पालकांनी क्वालिटी टाईम देणे गरजेचे आहे. तसेच ते काय करतात, ते कोणाबरोबर राहतात, त्यांची संगत कशी आहे, फ्रेंडसर्कल कसे आहे, त्यांच्या सवयींमध्ये काही बदल झाला आहे का, आपले मूल आपल्याशी काही लपवल्यासारखे वागते आहे का यावर पालकांचे अत्यंत सजगपणाने लक्ष असले पाहिजे.

अमली पदार्थांच्या आहारी गेलेले अनेक तरुण आपल्या वडिलांच्या व्यवसायातून पैसे चोरतात, क्रेडिट कार्डचा वापर करून कर्जबाजारी होतात; पण तरीही पालकांना याचा थांगपत्ता नसतो. काही पालक हे लक्षात आले, तरी तरुण वय आहे, पैसा लागतोच असे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. वास्तविक, हे चुकीचे आहे. मुलांचे डोळे कसे आहेत, त्याच्यात काही सिंड्रोम्स दिसताहेत का, तो बावचळल्यासारखा, भ्रमिष्टासारखा वागतोय का, त्याची एकाग्रता कमी झाली आहे का, झोप कमी अथवा जास्त झाली आहे का या रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींचे निरीक्षण पालकांनी केले पाहिजे. कोणतेही व्यसन हे सुरुवातीला गंमत किंवा थ्रील म्हणून केले जाते. पण पाहता पाहता आपण त्याच्या मगरमिठीत कसे अडकत जातो हे समजत नाही. याबाबत पालकांनी वेळोवेळी मुलांना सावध केले पाहिजे. अगदी हुशार म्हणवली जाणारी मुलेही काही दिवसांत व्यसनाधिनतेच्या वाटेवर जाताना पाहायला मिळाली आहेत आणि त्यांचे आयुष्य बरबाद झाले आहे. अशी उदाहरणे मुलांसमोर आणली पाहिजेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.