Mahim Road :माहिमचा सेंट मायकल चर्च रोड बनतोय लव्हलेन

रात्रीच्या वेळेस आसपासच्या लोकांना चालतांना असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे.

168
Mahim Road :माहिमचा सेंट मायकल चर्च रोड बनतोय लव्हलेन
Mahim Road :माहिमचा सेंट मायकल चर्च रोड बनतोय लव्हलेन

माहिममधील एल जे रोड क्रॉस रोडला जोडणाऱ्या सेंट मायकल चर्च रोड हा सध्या लव्हलेन म्हणून ओळखला जात असून याठिकाणी रात्रीच्या वेळेस आसपासच्या लोकांना चालतांना असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. या रस्त्यावर तसेच पदपथावर अनधिकृत वाहने उभी केली जातात, शिवाय रात्रीच्या वेळी दिवाबत्तीही सुरु नसल्याने या रस्त्याचा वापर प्रेमीयुगुलांकडून मोठ्याप्रमाणात होत आहे. रस्त्यावरील अंधार आणि वाहने उभी असल्याने याचा आधार घेत प्रेमीयुगलांचा वावर याठिकाणी सुरु असल्याने या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे चालता येत नसल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. (Mahim Road)

माहिममधील एल जे क्रॉस रोड क्रमांक १ आणि सोनावाला अग्यारी मार्गाला जोडून सेंट मायकल चर्च रोड हा जात असून हा अरुंद असलेला रस्ता अनधिकृत वाहनतळाचा अड्डा बनला आहे. एका बाजुला बाहेरच्या गाड्या याठिकाणी रस्त्यावर तसेच पदपथांवर उभ्या केल्या जातात. तसेच याठिकाणी झाडे व वेली मोठ्याप्रमाणात वाढल्याने संपूर्ण रस्त्याच्या वरून या वेली जात आहेत. त्यामुळे रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश या वाढलेल्या झाडांच्या फांद्या तसेच वेलींमुळे अडला जावून त्यावर अंधार पसरला जातो. याच अंधाराचा फायदा घेत तसेच वाहनांचा आडोसा घेत प्रेमीयुगलांकडून या रस्त्याचा वापर केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून मोठ्याप्रमाणात केला जात आहे.

(हेही वाचा : BMC MIST MACHINES : कोविड काळातील मिस्ट मशिन्सची महापालिकेला झाली आठवण)

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्यावेळी या रस्त्यावरुन जाणेही भीतीचे ठरते. पथदिवे असले तरी त्यावर झाडे व वेलींमुळे त्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत नसल्याने अंधारच अधिकप्रमाणात असतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी आसपासच्या नागरिकांना तसेच महिलांना हा रस्ता वगळून अन्य मार्गाने वळणाचा प्रवास करत पायपीठ करावी लागते. सेंट मायकल चर्च रोड अग्यारी रोडला जिथे मिळतो तिथे पूर्वी कचरा टाकला जायचा. परंतु त्याच जागेवर पाणी भरणा करणारे टँकर उभे असल्याने आसपासच्या वैतीवाडीसह इतर लोकांकडून या रस्त्यावरच अन्य ठिकाणी कचरा टाकला जातो. मुळात याठिकाणी कोणत्याही प्रकारे घंटागाडीची सुविधा नसल्याने लोकांकडून उघड्यावर कचरा टाकला जातो, परिणामी स्थानिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो,असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे या रस्त्यावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तसेच वेली काढून टाकल्यास वीजेचा लख्ख प्रकाश या रस्त्यावर पसरेल. तसेच वाहने उभी करण्यास बंदी घातल्यास या मार्गावर प्रेमीयुगलांचा वावर थांबेल असे स्थानिकांचे म्हणणे असून महापालिका आणि पोलिस यांनी संयुक्तपणे ही कार्यवाही अशी त्यांची मागणी आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.