World Cup 2023 : न्यूझीलंडची विजयी घोडदौड रोखत भारताचा ‘विराट’ विजय

४ गडी राखून भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला.

118
World Cup 2023 : न्यूझीलंडची विजयी घोडदौड रोखत भारताचा 'विराट' विजय
World Cup 2023 : न्यूझीलंडची विजयी घोडदौड रोखत भारताचा 'विराट' विजय

विराट कोहलीच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने वर्ल्डकपमधील सलग पाचव्या विजयाची नोंद केली. यामुळे वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध सलग सहाव्या विजयाची नोंद करण्याचे न्यूझीलंडचे स्वप्न भंगले. २००३ नंतर भारत वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदाही विजयी झाला नव्हता. मात्र या विजयाने भारताने न्यूझीलंडची विजयी घोडदौड रोखली आहे‌. ४ गडी राखून भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. (World Cup 2023 )

विराट कोहलीने १०४ चेंडूत ९५ धावा करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याला रवींद्र जडेजाने ४३ चेंडूत ३५ धावा करून चांगली साथ दिली. धावांचा पाठलाग करताना विराट कोहली ३३ वेळा नाबाद राहिला आहे ज्यात भारताने ३२ वेळा विजय मिळवला आहे.

न्यूझीलंडने दिलेल्या २७३ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या दहा षटकांत ६ पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा उभारून या दोघांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. मात्र रोहित शर्मा ४६ धावांवर तंबूत परतला आणि पाठोपाठ शुभमन गिलही २६ धावांवर झेलबाद झाला. तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि श्रेयश अय्यर यांनी ५२ धावांची भागिदारी रचली. अय्यर ३३ धावांवर बाद झाला. १८२ धावांवर भारताला चौथा धक्का बसला. २७ धावांवर के एल राहुल बाद झाला. त्यानंतर आलेला सुर्यकुमार यादव अवघ्या दोन धावा करून तंबूत परतल्याने भारत काहीसा बॅकफूटवर गेला होता. पण रवींद्र जडेजाने विराट कोहलीला चांगली साथ दिल्याने भारताने सामन्यावर आपली पकड पुन्हा घट्ट केली.

न्यूझीलंडची तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागिदारी

पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या षटकांत चांगली गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला २७३ धावांवर रोखले. मोहम्मद शामीने पाच विकेट घेत न्यूझीलंडच्या धावांना थोडा ब्रेक लावला. न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली होती. मात्र राचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची दमदार भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणून ठेवले. मिचेलने ९ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १३० धावा केल्या.(world cup 2023)

भारतीय गोलंदाजांची चांगली सुरुवात

रोहित शर्माने टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली सुरुवात करून गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. मोहम्मद शमीने सलामीच्या डेव्हॉन कॉनवेला शून्यावर बाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीने सलामीवीर विल यंगलाही १७ धावांवर बाद केले आणि संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यामुळे न्यूझीलंडची २ बाद १९ अशी अवस्था झाली.

अपेक्षित धावसंख्या उभारण्यात न्यूझीलंडला अपयश

तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या रवींद्र आणि मिचेल यांच्या भागिदारीमुळे न्यूझीलंड ३०० धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते. मात्र कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या हातात चेंडू दिला आणि त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत राचिन रवींद्रला बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. राचिनने सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७५ धावांची खेळी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामान्यात वर्चस्व प्रस्थापित करत २७३ धावांत न्यूझीलंडच्या संघाला तंबूत धाडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.