इस्त्रायल आणि हमास (Israel-Hamas Conflict) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्धाची अत्यंत भीषण परिस्थिती सुरू असतानाच इस्त्रायल सैन्याकडून (Israeli military) एअर स्ट्राइक केल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
एपीच्या रिपोर्टनुसार, इस्त्रायली लष्कराने गाझा पट्टीच्या खान युनिसमध्ये रात्री एअरस्ट्राइक केला. यामध्ये एका चार मजली निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. एअरस्ट्राइकनंतर जे लोकं वाचले त्यांनी सांगितले की, या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना खान युनूस येथील नासेर रुग्णालयात नेण्यात आले आहे.
गाझा शहरातील अल-वफा रुग्णालयाच्या आसपासच्या भागात एअरस्ट्राइक केला जात आहे. रुग्णालयाचे जनरल मॅनेजर फवाद नाझिम यांनी सांगितले की, रुग्णालयामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग आणि आजूबाजूच्या परिसरात एअरस्ट्राइकद्वारे लक्ष्य केले जात आहे. एअरस्ट्राइक करण्यापूर्वी कोणताही इशारा देण्यात आला नव्हता. रुग्णालयातील बहुतांश रुग्ण कोमात असल्याने त्यांना आम्ही सोडू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Civilians and hospitals in Gaza need fuel to produce electricity.
Hamas has that fuel. https://t.co/yWNPEK4x7D
— Israel Defense Forces (@IDF) October 24, 2023
इस्त्रायलच्या संरक्षण दलाने दावा केला आहे की, हमास गाझामधील रुग्णालये आणि जनरेटरसाठी आवश्यक इंधन साठवत आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध झालेल्या एका पोस्टनुसार, इस्रायली लष्कराने इजिप्तच्या सीमेवर तैनात हमासने चालवलेल्या १२ इंधन टाक्यांचे सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केले आहेत. गाझामधील रुग्णालयांमध्ये इंधन संपल्याने वीज तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे.
हमासने केली ‘ही’ मागणी
हमासने इस्त्रायलकडून ५० ओलिस ठेवलेल्या व्यक्तिंऐवजी इंधन पुरवठ्याची मागणी केली आहे, मात्र इस्रायलने ही मागणी फेटाळून लावली आहे. २२० ओलिसांची सुटका केल्यानंतरच ते इंधन पुरवठा करण्यास परवानगी देतील, असं इस्रायलचं म्हणणं आहे.