स्वातंत्र्यवीर सावरकारांचा अपमान ज्यांनी केला त्या मणीशंकर अय्यरला बाळासाहेबांनी जोडे मारण्याचे काम केलं. आज त्याच कॉंग्रेसचे जोडे हे लोकं उचलतायत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. यापुढे आणखी काय होईल काहीच सांगता येत नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Dasara Melava) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना वंदन करून शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला असल्याचे शिंदे म्हणाले, आमदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत सभेला जमलेल्या गर्दीला उद्देशून ही महाराष्ट्रातून आलेली भगवी लाट असल्याचे ते म्हणाले.
एका शिवसैनिकाच्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला. शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. अशी एक नाही अनेक उदाहरणं आहेत. बाळासाहेब ज्यांना गाडण्याची भाषा करायचे त्यांना डोक्यावर घेताय. कारसेवकांवर गोळीबार कोणी केला, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. गद्दार, महागद्दार कोण हेही आपल्याला माहीत आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटला तर चालेल का ? गर्वसे कहो हम कॉंग्रेस के साथ हो, असे म्हटलं तर चालेल का ? असे प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारले.
रमेश प्रभूंनी बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला, त्यांना हे लोकं डोक्यावर घेताय, बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण पुढे चाललोय. इतर धर्मीयांचा आपण आदर करतोय. साबीर शेख बाळासाहेबांच्या काळात मंत्री होते. सत्तेसाठी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. आमदारांचं लोकप्रितिनिधित्व फायदा-तोटा याच्याशी त्यांची बांधिलकी नाही. त्यांची बांधिलकी फक्त पैशाशी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मैदानापेक्षा विचार महत्त्वाचे…
शिवसेनेच्या मेळाव्याविषयी आठवण सांगताना ते म्हणाले की, मीदेखील बाळासाहेबांचं भाषण ऐकायला समोर बसायचो. तेव्हा टपावर बसून, ढोल-ताशे बडवत, बाळासाहेबांचे विचार ऐकायला आपण सगळे यायचो आणि बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ चा नारा दिला. संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाची लाट पसरली. हिंदुत्वाचा जयघोष होऊ लागला. याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. तो आपण सगळ्यांनी प्राणपणाने जपला, मात्र बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. कुठे बाळासाहेबांचा विचार आणि कुठे सत्तेसाठी लाचारी. मैदानापेक्षा विचार महत्त्वाचे आहेत. बाळासाहेबांचे विचार माझ्यासाठी शीवतीर्थ आहेत. ज्या कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे ज्यांनी वाभाडे काढले त्यांचे गोडवे आता गायले जात आहेत. बाळासाहेबांचे विचार या मैदानात बसून ऐकणारा हा शिवसैनिक आहे. आज बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली आहे.