ऋजुता लुकतुके
२०२१ आणि २०२२ मध्ये देशाचा आर्थिक विकासदर (India GDP) चढाच होता. आणि आता २०२३ मध्येही देशाची वाटचाल सकारात्मक असेल असाच अंदाज आहे. आणि त्या जोरावर भारत २०३० पर्यंत जपानला मागे टाकून जीडीपी निकषावर जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल असं एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे.
२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा (India GDP) आकार ७.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका होईल, असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. मार्च २०२४ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासदर ६.२ ते ६.३ टक्के इतका असेल, असाही संस्थेचा अंदाज आहे. सध्या भारत ही चीन आणि जपान खालोखाल आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. आता जागतिक स्तरावरही भारत जपानला मागे टाकतील असा अंदाज आहे.
(हेही वाचा-Manoj Jarange Patil : सरकारची मुदत संपली; मनोज जरांगेंचे आजपासून पुन्हा उपोषण)
देशात परकीय चलनाचा साठा वाढतोय, परकीय गुंतवणूक वाढतेय. आणि लोकसंख्येत तरुणांचा वाटा जास्त असल्यामुळे लोकांचं सरासरी घरगुती उत्पन्न येणाऱ्या दिवसांमध्ये वाढतं असेल, असा एस अँड पी संस्थेचा अंदाज आहे. आणि त्यावर आधारित हा अहवाल आहे. २०२२ मध्येच भारताने जीडीपीच्या निकषावर युके आणि फ्रान्सला मागे टाकलं होतं.
संयुक्त अमेरिका आजही २५.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलरसह पहिल्या स्थानावर आहे. तर चीन १८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर सह दुसऱ्या स्थानावर आहे. जपानची अर्थव्यवस्था ४.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. भारतात मध्यमवर्ग झपाट्याने प्रगती करतोय. आणि इंटरनेट तसंच दूरसंचार सेवाही विस्तारलेली आहे. आणि त्यामुळे उत्पादन आणि सेवा क्षेत्रात भारताचा विकास जोमाने होतोय, असं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community