ऋजुता लुकतुके
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघाने (Ind vs Eng) दोन दिवस धरमशाला इथंच विश्रांती घेतली. आणि त्यानंतर बुधवारी उशिरा भारतीय संघ पुढील सामन्यासाठी लखनौ इथं दाखल झाला आहे. इथं एकाना स्टेडिअमवर २९ ऑक्टोबरला भारताचा मुकाबला इंग्लंडच्या संघाशी होणार आहे.
न्यूझीलंड बरोबरच्या विजयानंतर भारतीय संघ पाच पैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेत आघाडीवर आहे. तर गतविजेता इंग्लिश संघ ४ पैकी ३ सामने हरल्यामुळे नवव्या स्थानावर फेकला गेला आहे. त्यामुळे जोस बटलरच्या या संघावर भारताविरुद्ध चांगलंच दडपण असेल.
भारतीय संघ बुधवारी लखनौच्या चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला तेव्हा खेळाडूंच्या स्वागतासाठी शेकडो चाहते विमानतळाबाहेर जमले होते. अनेकांनी संघाचा हॉटेलपर्यंत पाठलागही केला. तर हॉटेलच्या बाहेरही दुतर्फा चाहते आधीच जमलेले होते.
Hello Lucknow 👋#TeamIndia are here for their upcoming #CWC23 clash against England 👌👌#MenInBlue | #INDvENG pic.twitter.com/FNF9QNVUmy
— BCCI (@BCCI) October 25, 2023
हॉटेलमध्येही भारतीय संघाचं पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं. तसंच खेळाडूंना माळाही घालण्यात आल्या. जायबंदी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या या संघाबरोबर नाहीए. आधी तो लखनौला (Ind vs Eng) संघामध्ये दाखल होईल, असा अंदाज बीसीसीआयनेच व्यक्त केला होता. पण, अजून हार्दिकने नेट्समध्ये गोलंदाजी करायला सुरुवात नाही केलेली. आणि पुढचे दोन सामने तो मुकेल असं आता बोललं जात आहे. त्यामुळे लखनौमध्ये त्याची अनुपस्थिती नक्कीच जाणवत होती.
भारताने अजून हार्दिकसाठी बदली खेळाडूची मागणी केलेली नाही. म्हणजेच हार्दिक वेळेवर तंदुरुस्त होईल अशीच संघाला आशा आहे. रविवारच्या सामन्यापूर्वी भारताला ७ दिवसांची विश्रांती मिळाली आहे. आता गुरुवारी भारतीय संघ ऐच्छिक सराव सत्राने सरावाला सुरुवात करेल.
तर शुक्रवारी आणि शनिवारी संघाचे नियमित नेट्स असतील. अलीकडे भारतीय संघाच्या सराव सत्रांसाठी पत्रकारांना प्रवेश दिला जात नाहीए.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community